पेणमध्ये महिलांसाठी कौशल्य विकास शिबिराला सुरुवात
आर्थिक स्वावलंबनासाठी आरी वर्क, फॅशन डिझाईनसह विविध प्रशिक्षण रायगड, ५ ऑक्टोबर (हिं.स.) : पेण : महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी आणि सक्षम करण्याच्या उद्देशाने पेण नगरपालिकेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने महिला कौशल्य विकास शिबिराला सुरु
We will definitely empower women: Pen Municipal Council resolves to focus on skill development.


आर्थिक स्वावलंबनासाठी आरी वर्क, फॅशन डिझाईनसह विविध प्रशिक्षण

रायगड, ५ ऑक्टोबर (हिं.स.) : पेण : महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी आणि सक्षम करण्याच्या उद्देशाने पेण नगरपालिकेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने महिला कौशल्य विकास शिबिराला सुरुवात करण्यात आली आहे. नगराध्यक्षा प्रितम पाटील यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन झाले.

“पेणमधील महिलांना सक्षम करणे हे आमचे कर्तव्य असून ते आम्ही पार पाडू,” असा निर्धार नगराध्यक्षा प्रितम पाटील यांनी यावेळी व्यक्त केला. महिलांनी घरातील जबाबदाऱ्या सांभाळतानाच आपल्या कौशल्याच्या जोरावर स्वतःचा व्यवसाय उभारावा, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.

महिला व बालकल्याण सभापती कलावती पाटील यांच्या प्रस्तावाला नगराध्यक्षा आणि सहकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्यानंतर या शिबिराला सुरुवात झाली. शिबिरामध्ये महिलांना आरी वर्क, फॅशन डिझाईन, कापडी व कागदी पिशव्या तयार करणे यांसह विविध कौशल्यांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.

महिलांच्या फावल्या वेळेचा उपयोग उत्पन्नाचे साधन निर्माण करण्यासाठी व्हावा आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम होता यावे, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे सभापती कलावती पाटील यांनी सांगितले.

शिबिरासाठी मोठ्या संख्येने महिलांनी नोंदणी केली असून, इच्छुक महिलांना टप्प्याटप्प्याने प्रशिक्षण देण्यात येणार आहे. महिला व बालकल्याण विभागासाठी उपलब्ध असलेल्या निधीचा उपयोग महिलांच्या विकासासाठी करण्यात येईल, असेही कलावती पाटील यांनी स्पष्ट केले.

या वेळी उपनगराध्यक्ष निवृत्ती पाटील, मुख्याधिकारी जीवन पाटील, विविध समित्यांचे सभापती तसेच नगरसेवक-नगरसेविका आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.

--------------------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande