अलिबागमध्ये ‘अमृत पेठ थेट स्वदेशी बाजारपेठ’ उपक्रम यशस्वी
लघुउद्योजकांच्या वस्तूंना बाजारपेठ तीन दिवसांत विविध वस्तूंची मोठ्या प्रमाणात विक्री रायगड, ५ ऑक्टोबर (हिं.स.) : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) संस्थेच्या वतीने आयोजित ‘अमृत पेठ थेट स्वदेशी बाजारपेठ’ हा उपक्रम अलिबाग येथे उ
अलिबागमध्ये ‘अमृत पेठ थेट स्वदेशी बाजारपेठ’ उपक्रम यशस्वी


लघुउद्योजकांच्या वस्तूंना बाजारपेठ तीन दिवसांत विविध वस्तूंची मोठ्या प्रमाणात विक्री

रायगड, ५ ऑक्टोबर (हिं.स.) : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) संस्थेच्या वतीने आयोजित ‘अमृत पेठ थेट स्वदेशी बाजारपेठ’ हा उपक्रम अलिबाग येथे उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडला. २ ते ४ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत टिळक रोड येथील हॉटेल व्हेव्ज बॅक्वेट हॉलमध्ये या बाजारपेठेचे आयोजन करण्यात आले होते.

महाराष्ट्र शासनाची ‘अमृत’ ही स्वायत्त संस्था असून, इतर मागासवर्गीय बहुजन विकास कल्याणांतर्गत तसेच खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी विविध व्यवसायोत्तेजक प्रशिक्षण वर्ग घेतले जातात. प्रशिक्षणातून तयार होणाऱ्या लघुउद्योजकांच्या उत्पादनांना प्रदर्शन व विक्रीसाठी हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देणे, त्यांच्या उत्पादनांना व्यापक बाजारपेठ मिळवून देणे तसेच त्यांचे उद्योग-व्यवसाय देश-विदेशात पोहोचविणे हा ‘अमृत पेठ’ उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. याशिवाय शासनाच्या विविध योजना व प्रशिक्षणांचा लाभ कसा घेता येईल, याबाबतही उद्योजकांना मार्गदर्शन केले जाते.

अलिबाग येथे आयोजित ‘अमृत पेठ थेट बाजारपेठ’ सकाळी १० ते रात्री ९ वाजेपर्यंत नागरिकांसाठी खुली ठेवण्यात आली होती.

उपक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी संतोष सुतार, संघचालक (कुलाबा जिल्हा), ॲड. अंकित बंगेरा, नगरसेवक, अलिबाग नगरपरिषद, ऍड. वैशाली अंकित बंगेरा, अविनाश घाट, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, दयानंद खरात, सामाजिक कार्यकर्ते तसेच वात्सल्य ट्रस्टच्या प्रकल्प अधिकारी सौ. शोभा जोशी यांची उपस्थिती होती.

अलिबाग शहर व परिसरातील नागरिकांनी मित्रपरिवारासह अमृत पेठेला भेट देत खरेदीचा आनंद घेतला.

बाजारपेठेत घरगुती खाद्यपदार्थ, नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर विविध प्रकारची तोरणे, इमिटेशन ज्वेलरी, दिवे, पणत्या, ड्रेस मटेरियल, विविध प्रकारच्या साड्या, धार्मिक वस्तू, घरगुती पिठे, पर्सेस यांसह विविध वस्तूंचे स्टॉल उभारण्यात आले होते.

तीन दिवसांच्या या उपक्रमाला मिळालेल्या प्रतिसादामुळे स्टॉलधारक समाधान व्यक्त केले. त्यांनी आणलेल्या वस्तू अपेक्षेप्रमाणे विकल्या गेल्याने हा उपक्रम यशस्वी ठरल्याचे अमृत रायगड जिल्हा व्यवस्थापक शैलेश मराठे आणि उपव्यवस्थापक कु. मंगेश ढेबे यांनी सांगितले.

या उपक्रमाच्या आयोजनासाठी अमृत सखी जान्हवी साठे, सौ. पल्लवी मंदार जोशी, महेंद्र साठे, सौ. दीक्षा कारूळकर, कु. विक्रम मंदार जोशी, ॲड. अंकित बंगेरा, वैशाली अंकित बंगेरा आणि मानस कुंटे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

अमृत संस्थेच्या या उपक्रमाबद्दल सर्वोदय उपक्रमाला नागरिकांकडूनही चांगला प्रतिसाद मिळाला. लघुउद्योजकांना थेट ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाल्याने स्थानिक उद्योजकांसाठी हा उपक्रम उपयुक्त ठरला.

-----------------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande