लातूर तालुक्यात पिकांच्या नुकसानीचे पंचनामे सुरू
चिकलठाणा, कासारखेडा व मळवटीत महसूल-कृषी विभागाकडून पाहणी लातूर, ५ ऑक्टोबर (हिं.स.) : शासनाच्या निर्देशानुसार लातूर तालुक्यातील चिकलठाणा, कासारखेडा आणि मळवटी परिसरात पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यास सुरुवात झाली आहे. उपविभागीय अधिकारी रोहिणी न-ह
पिकांच्या नुकसानीचे पंचनामे


चिकलठाणा, कासारखेडा व मळवटीत महसूल-कृषी विभागाकडून पाहणी

लातूर, ५ ऑक्टोबर (हिं.स.) : शासनाच्या निर्देशानुसार लातूर तालुक्यातील चिकलठाणा, कासारखेडा आणि मळवटी परिसरात पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यास सुरुवात झाली आहे. उपविभागीय अधिकारी रोहिणी न-हे विरोळे, तहसीलदार सौदागर तांदळे आणि तालुका कृषी अधिकारी प्रमोद राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल, कृषी आणि ग्रामविकास विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून ही प्रक्रिया राबविण्यात येत आहे.

संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांनी आज, सोमवारी प्रत्यक्ष शेताच्या बांधावर जाऊन पिकांच्या नुकसानीची पाहणी केली. सहाय्यक कृषी अधिकारी झांबरे व्ही. एम., ग्राम महसूल अधिकारी गुंडरे आणि ग्रामविकास अधिकारी डोंगरे यांच्यासह शेतकऱ्यांच्या उपस्थितीत नुकसानीचे पंचनामे करण्यात येत आहेत.

शासनाच्या निर्देशानुसार पंचनाम्यांमध्ये ‘अ’मध्ये जिरायती क्षेत्र, ‘ब’मध्ये बागायती क्षेत्र, ‘क’मध्ये बहुवार्षिक फळबाग क्षेत्र, तर ‘ड’मध्ये तिन्ही प्रकारांचा गोषवारा अशी माहिती संकलित केली जात आहे.

हंगामी सोयाबीन पिकासोबतच वार्षिक बागायती पीक असलेल्या ऊस पिकाचाही पंचनाम्यात समावेश करण्यात येत आहे. भविष्यात चारा टंचाई निर्माण झाल्यास शेतातील ऊस पशुधनासाठी चारा म्हणून राखीव ठेवणे किंवा झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याच्या दृष्टीने या पंचनाम्यांना महत्त्व प्राप्त झाले आहे.

शासनाला पिकांच्या नुकसानीची वस्तुनिष्ठ आणि अचूक माहिती उपलब्ध व्हावी, यासाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून प्रत्यक्ष शेतावर जाऊन पारदर्शक पद्धतीने पंचनाम्याची प्रक्रिया राबविण्यात येत आहे.

-----------------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande