
एकीला नेरुळ रेल्वेस्थानक परिसरातून अटक; दुसरीचा शोध सुरू
रायगड, ५ ऑक्टोबर (हिं.स.) : साडीचा दोरखंड बनवून आरपीएफच्या लॉकअपमधून दोन महिला आरोपींनी पलायन केल्याची धक्कादायक घटना बेलापूर रेल्वे सुरक्षा दलाच्या पोलीस ठाण्यात घडली. या घटनेमुळे आरपीएफच्या लॉकअपमधील सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, आरोपींच्या पलायनाची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
जुईनगर रेल्वेस्थानकातील गोदामातून ओव्हरहेड इलेक्ट्रिक वायर चोरी केल्याच्या आरोपावरून आरपीएफने २६ सप्टेंबर रोजी जालन्याची रुपाली कुऱ्हाडे (३०) आणि भिवंडीची शालीबाई पवार (४०) यांना अटक केली होती. न्यायालयाने दोघींना ३० सप्टेंबरपर्यंत आरपीएफ कोठडी सुनावली होती.
दरम्यान, दोघींनी लॉकअपच्या गजांमधून हात बाहेर काढून कुलूप तोडले आणि दरवाजाची कडी उघडली. त्यानंतर ठाण्याच्या मागील बाजूस असलेल्या बाल्कनीत जाऊन जनरेटरला साड्यांपासून तयार केलेला दोरखंड बांधला. या दोरखंडाच्या सहाय्याने इमारतीवरून खाली उतरून दोघींनी पलायन केले.
यावेळी रात्रपाळीवरील महिला कर्मचारी बाथरूममध्ये गेल्याची माहिती समोर आली आहे. महिला आरोपी फरार झाल्याचे लक्षात येताच आरपीएफमध्ये एकच खळबळ उडाली. त्यानंतर तातडीने शोधमोहीम हाती घेण्यात आली.
सकाळी पावणेनऊच्या सुमारास रुपाली कुऱ्हाडे हिला नेरुळ रेल्वेस्थानक परिसरातून पकडण्यात आले. मात्र, शालीबाई पवार अद्याप फरार असून तिचा शोध सुरू आहे.
लॉकअपमधून आरोपींनी अशाप्रकारे सहज पलायन केल्याने आरपीएफच्या सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटींचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
-----------------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)