नोकरीचे आमिष दाखवून २२.७० लाखांची फसवणूक
रायगड, ५ ऑक्टोबर (हिं.स.) : नेरळ : स्पाईसजेट आणि मुंबई रेल्वेत नोकरी लावण्याचे आमिष दाखवत बनावट प्रमाणपत्रे, नियुक्तीपत्रे आणि ई-मेल तयार करून तब्बल २२ लाख ७० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार कर्जत तालुक्यातील पाषाणे येथे उघडकीस आला आहे. याप्रक
Swindled of ₹22.70 lakh on the pretext of a job


रायगड, ५ ऑक्टोबर (हिं.स.) : नेरळ : स्पाईसजेट आणि मुंबई रेल्वेत नोकरी लावण्याचे आमिष दाखवत बनावट प्रमाणपत्रे, नियुक्तीपत्रे आणि ई-मेल तयार करून तब्बल २२ लाख ७० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार कर्जत तालुक्यातील पाषाणे येथे उघडकीस आला आहे. याप्रकरणी नेरळ पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादीच्या वडिलांशी असलेल्या जुन्या मैत्रीचा फायदा घेत त्यांच्या दोन मुलांना स्पाईसजेटमध्ये नोकरी लावण्याचे आमिष दाखवले. त्यासाठी आरोपींनी आरटीजीएसद्वारे ८ लाख ६० हजार रुपये घेतले. मात्र, नोकरी न लावता कंपनीचे बनावट प्रमाणपत्र देण्यात आले. त्यानंतर पोलीस व्हेरिफिकेशन तसेच अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे कारण सांगून फिर्यादीची दिशाभूल करत वेळकाढूपणा करण्यात आला.

यानंतर आरोपी क्रमांक दोनने मुंबई रेल्वेत क्लार्क पदावर नोकरी लावण्याचे आमिष दाखवून आणखी १४ लाख १० हजार रुपये घेतले. यासाठी रेल्वेचे बनावट नियुक्तीपत्र तयार करण्यात आले. तसेच बनावट ई-मेल आयडीच्या माध्यमातून नोकरी लागल्याचा खोटा ई-मेलही पाठविण्यात आला.

अशाप्रकारे आरोपींनी एकूण २२ लाख ७० हजार रुपये उकळून फसवणूक केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २२०/२०२६ अन्वये दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास एपीआय वरुटे करीत आहेत.

---------------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande