माणगावात मटका-जुगार अड्ड्यांवर धडक कारवाई; १४ जणांवर गुन्हे
रायगड, ५ ऑक्टोबर (हिं.स.) : माणगाव : मटका-जुगार अड्ड्यांवर माणगाव पोलिसांनी धडक कारवाई करत १४ जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. या कारवाईत पोलिसांनी रोख रक्कम, मोबाईल आणि जुगाराचे साहित्य असा एकूण १ लाख २४ हजार ८५५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
‘Surgical strike’ in Mangaon; raids at three locations, cases registered against 14 individuals.

रायगड, ५ ऑक्टोबर (हिं.स.) : माणगाव : मटका-जुगार अड्ड्यांवर माणगाव पोलिसांनी धडक कारवाई करत १४ जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. या कारवाईत पोलिसांनी रोख रक्कम, मोबाईल आणि जुगाराचे साहित्य असा एकूण १ लाख २४ हजार ८५५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

निजामपूर टेकडी, निजामपूर गाव तसेच माणगाव शहरातील खांदाड परिसरात ४ आणि ५ ऑक्टोबर रोजी ही कारवाई करण्यात आली. पोलीस निरीक्षक मारुती आंधळे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी ही कारवाई केली.

निजामपूर टेकडी परिसरातील सहा, निजामपूर बाजारपेठेतील चार, तर माणगाव शहरातील खांदाड-सिद्धीनगर परिसरातील चार जणांवर पोलिसांनी कारवाई केली. जुगार खेळणाऱ्यांसह जुगाराचे खेळ आयोजित करणाऱ्यांवरही पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला.

या कारवाईदरम्यान रोख रक्कम, मोबाईल फोन तसेच जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले. संबंधित आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

रविवारची सुट्टी असतानाही पोलिसांनी अवैध धंद्यांविरोधात केलेल्या या कारवाईमुळे मटका-जुगार व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे. रायगड पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कारवाईतून अवैध धंद्यांना थारा दिला जाणार नसल्याचा संदेश पोलिसांनी दिला आहे.

-------------------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)

 rajesh pande