
महाविकास आघाडी व ‘इंडिया’ आघाडीतील घटक पक्षांचा निर्णय
दुष्काळ व शेतकरी प्रश्नांवरही सरकारचे लक्ष वेधणार
लातूर, ५ ऑक्टोबर (हिं.स.) : लातूर येथील काँग्रेस भवनमध्ये महाविकास आघाडी आणि ‘इंडिया’ आघाडीतील घटक पक्षांची जिल्हास्तरीय संयुक्त बैठक पार पडली. बैठकीनंतर झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत ८ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता निलंगा येथे ‘वोट बचाव, देश बचाव’ मोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली.
‘लोकशाही वाचवा सप्ताहा’अंतर्गत हा मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज चौक ते उपविभागीय अधिकारी कार्यालय या मार्गावर काढण्यात येणार आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार), शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), शेतकरी कामगार पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, समाजवादी पक्ष यांच्यासह विविध समविचारी संघटना मोर्चात सहभागी होणार असल्याचे सांगण्यात आले.
लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अभय साळुंके यांनी देशातील लोकशाही आणि संविधानाबाबत चिंता व्यक्त केली.
एसआयआर प्रक्रियेमुळे देशभरात कोट्यवधी, महाराष्ट्रात सुमारे दोन कोटी आणि लातूर जिल्ह्यात दोन लाखांहून अधिक मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. या आकडेवारीची स्वतंत्र पडताळणी या निवेदनात करण्यात आलेली नाही.
मतदानाचा अधिकार हा संविधानाने दिलेला अधिकार असल्याने निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता राहावी, अशी भूमिका बैठकीत मांडण्यात आली. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर कारवाई करून त्यांना पदावरून दूर करावे तसेच भविष्यातील निवडणुका मतपत्रिकेवर घेण्यात याव्यात, अशा मागण्याही करण्यात आल्या.
दुष्काळ व शेतकरी प्रश्नांवरही आंदोलन
निलंग्यातील मोर्चाच्या माध्यमातून दुष्काळ आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडेही सरकारचे लक्ष वेधण्यात येणार असल्याचे आघाडीच्या नेत्यांनी सांगितले. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी एक लाख रुपये मदत, शेतमजुरांना किमान २५ हजार रुपयांचे अर्थसहाय्य, जनावरांसाठी चारा छावण्या आणि चाऱ्याची व्यवस्था करण्याची मागणी करण्यात येणार आहे.
मनरेगाच्या अटी शिथिल करून गावागावांत रोजगार उपलब्ध करून द्यावा, अशी मागणीही करण्यात आली.
महसूल विभागाच्या पंचनाम्यांनुसार पीक नुकसानीचा विचार करून सर्व शेतकऱ्यांना विनाअट सरसकट पीक विमा मंजूर करावा. तसेच बटाईने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनाही शासकीय मदतीचा लाभ मिळावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
निलंग्यातील आंदोलनानंतर लातूर जिल्ह्यातील इतर तालुक्यांमध्येही टप्प्याटप्प्याने मोर्चे आणि आंदोलने करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. ८ ऑक्टोबरच्या मोर्चात नागरिक, युवक आणि शेतकऱ्यांनी तिरंगा हातात घेऊन मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात आले.
पत्रकार परिषदेला लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रा. डॉ. शिवाजी जवळगेकर, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील, प्रदेश उपाध्यक्ष डॉ. बापूसाहेब उजेडकर, रघुनाथ कुचेकर, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाध्यक्ष बालाजी रेड्डी, शंकर रांजणकर, महादेव कलमुकळे, शेतकरी कामगार पक्षाचे नेते ॲड. उदय गवारे, माकपचे संजय मोरे, कॉम्रेड विश्वंभर भोसले, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विजय जाधव, बालाजी कदम, प्रभाकर बंडगर, मारुती पांडे, तानाजी फुटाणे, गंगासिंह कदम, गोविंद बोराडे, निलेश देशमुख, प्रवीण सूर्यवंशी, प्रा. प्रवीण कांबळे, गोपाळ भंडे, शंकर महाराज यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.
------------------------------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis