गाझाचा बदला घेण्यासाठी हल्ला’; फ्लायदुबईच्या सहवैमानिकाचा धक्कादायक दावा
जेरुसलेम, 06 ऑक्टोबर (हिं.स.)।इस्रायली ऑनलाइन वृत्तपोर्टलच्या वृत्तानुसार, दुबईहून तेल अवीवला जाणाऱ्या ‘फ्लायदुबई’च्या विमानाच्या कॅप्टनवर हल्ला करून विमान कोसळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या ओमानी सहवैमानिकाने तपास अधिकाऱ्यांना सांगितले की, त्याने गाझाचा
गाझाचा बदला घेण्यासाठी हल्ला’; फ्लायदुबईच्या सहवैमानिकाचा धक्कादायक दावा


जेरुसलेम, 06 ऑक्टोबर (हिं.स.)।इस्रायली ऑनलाइन वृत्तपोर्टलच्या वृत्तानुसार, दुबईहून तेल अवीवला जाणाऱ्या ‘फ्लायदुबई’च्या विमानाच्या कॅप्टनवर हल्ला करून विमान कोसळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या ओमानी सहवैमानिकाने तपास अधिकाऱ्यांना सांगितले की, त्याने गाझाचा बदला घेण्यासाठी हा हल्ला केला होता.हमम अल-हम्मामीने सांगितले, “मी गाझाचा बदला घेण्यासाठी हे केले. मला शहीद होऊन मरायचे होते.”

वृत्तानुसार, ओमानचा वैमानिक हमम अल-हम्मामी याने तपास अधिकाऱ्यांना सांगितले की, गाझाचा बदला घेण्यासाठी आणि शहीद होण्यासाठी त्याने हा हिंसक हल्ला केला. त्याने हे कृत्य एकट्याने केले होते की त्यामागे आणखी कोणाचा सहभाग होता, हे शोधण्यासाठी अधिकारी आता त्याचा मोबाईल फोन, परदेशातील प्रवास आणि संपर्कांची तपासणी करत आहेत.

हमम अल-हम्मामीचा हा कथित कबुलीजबाब अशा वेळी समोर आला आहे, जेव्हा त्याला गेल्या वर्षी त्याच्या अतिरेकी विचारसरणीमुळे ओमानच्या राष्ट्रीय विमान कंपनीतून काढून टाकण्यात आल्याचे वृत्त समोर आले आहे. वृत्तानुसार, त्यानंतर त्याच्या नावाने असलेल्या सोशल मीडिया खात्यांवर इस्रायली विमानांच्या कॉकपिटमधील व्हिडिओ आणि अल-कायदाशी संबंधित व्यक्तींचे व्हिडिओ पोस्ट करण्यात आले होते.इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी यापूर्वी सांगितले होते की, सहवैमानिकावर “इस्लामी कट्टरतावादी विचारसरणीचा” प्रभाव असल्याचे मानले जात आहे.

३० सप्टेंबर रोजी फ्लायदुबईच्या एफझेड१०७३ या विमानात १७० हून अधिक प्रवासी होते. त्यापैकी बहुतांश प्रवासी इस्रायली होते. विमानाच्या लँडिंगला एक तासापेक्षाही कमी वेळ बाकी असताना अल-हम्मामीने कॅप्टन स्मित मच्छार यांच्यावर हल्ला केला. फ्लाइट-ट्रॅकिंग डेटानुसार, विमान काही सेकंदांतच १७ हजार फुटांहून अधिक खाली घसरले.

विमानाचे कॅप्टन मच्छार यांनी सहवैमानिकाच्या हल्ल्याचा प्रतिकार केला आणि कॉकपिटचा दरवाजा उघडण्यात यश मिळवले. त्यामुळे प्रवाशांना नेमके काय घडत आहे, हे दिसले आणि त्यांना हस्तक्षेप करता आला. प्रवाशांनी अल-हम्मामीला नियंत्रणात आणण्यासाठी मदत केली. त्याचवेळी विमानातील ड्युटीवर नसलेल्या वैमानिकांनी विमानाचा ताबा घेतला. त्यामुळे संभाव्य भीषण विमान दुर्घटना टळली.

इस्रायली माध्यमांच्या वृत्तानुसार, अल-हम्मामीने जुलैमध्येही हल्ला करण्याचा विचार केला होता. मात्र, शेवटच्या क्षणी त्याने हा कट रद्द केला. विमानातील क्रू सदस्यांपैकी एक जण त्याचा मित्र असल्यामुळे त्याने त्यावेळी हल्ल्याचा निर्णय मागे घेतल्याचे सांगण्यात येते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande