
इस्लामाबाद, 06 ऑक्टोबर (हिं.स.)।पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतात मंगळवारी दहशतवाद्यांनी घातपात करून केलेल्या हल्ल्यात किमान चार सीमा शुल्क अर्थात कस्टम अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला.
अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, ही घटना दक्षिण वझिरीस्तानच्या सीमेला लागून असलेल्या डेरा इस्माईल खान जिल्ह्यात घडली. कस्टम विभागाचे हे अधिकारी तेथे कर्तव्यावर तैनात होते. त्याचवेळी दहशतवाद्यांनी त्यांच्यावर अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात चारही अधिकाऱ्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेनंतर मृतदेह रुग्णालयातील ट्रॉमा सेंटरमध्ये नेण्यात आले.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, दहशतवाद्यांनी डेरा इस्माईल खान जिल्ह्यातील तीन वेगवेगळ्या ठिकाणांना लक्ष्य केले. या हल्ल्यांमध्ये कस्टम अधिकाऱ्यांसोबतच महसूल मंडळाचे अधिकारी आणि वाहतूक पोलिसांनाही लक्ष्य करण्यात आले.
हल्ल्यानंतर दहशतवादी घटनास्थळावरून फरार झाले. घटनेची माहिती मिळताच मोठ्या संख्येने पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी संपूर्ण परिसराची नाकेबंदी करून घटनास्थळावरून पुरावे गोळा केले असून दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी तपास सुरू केला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode