सौदी अरेबियातील दोन विमानतळांवर हुतींचे हल्ले; ३ जण जखमी
रियाध, 06 ऑक्टोबर (हिं.स.)।सौदी अरेबियातील जिझान आणि नजरान येथील विमानतळांना सोमवारी संध्याकाळी दोन वेगवेगळ्या हल्ल्यांमध्ये लक्ष्य करण्यात आले. सौदी विमान वाहतूक प्राधिकरणाच्या माहितीनुसार, या हल्ल्यांमध्ये तीन जण जखमी झाले असून मर्यादित स्वरूपाचे
सौदी अरेबियातील दोन विमानतळांवर हुतींचे हल्ले; ३ जण जखमी


रियाध, 06 ऑक्टोबर (हिं.स.)।सौदी अरेबियातील जिझान आणि नजरान येथील विमानतळांना सोमवारी संध्याकाळी दोन वेगवेगळ्या हल्ल्यांमध्ये लक्ष्य करण्यात आले. सौदी विमान वाहतूक प्राधिकरणाच्या माहितीनुसार, या हल्ल्यांमध्ये तीन जण जखमी झाले असून मर्यादित स्वरूपाचे नुकसान झाले आहे.

येमेनमधील इराणसमर्थित हुती बंडखोर आणि सौदी अरेबिया यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हे हल्ले झाले आहेत. सौदीसमर्थित येमेन सरकारच्या सैन्याने लाल समुद्राच्या किनाऱ्यालगत हुती बंडखोरांच्या ताब्यातील भाग पुन्हा मिळवण्यासाठी मोठी लष्करी कारवाई तीव्र केली आहे. या कारवाईला पाठिंबा देण्यासाठी सौदी अरेबियाने हवाई हल्ले मोठ्या प्रमाणात वाढवले आहेत. त्याला प्रत्युत्तर म्हणून हुती बंडखोरांनीही सौदी अरेबियातील विमानतळे, तेल प्रकल्प आणि लष्करी तळांवर क्षेपणास्त्रे आणि ड्रोन हल्ले वाढवले आहेत.सरकारी सैन्याने सामरिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण बाब अल-मंदेब सामुद्रधुनीजवळील भागांवर पुन्हा ताबा मिळवल्यानंतर मोखा शहराच्या दिशेने आगेकूच सुरू केली आहे. त्यामुळे हुती बंडखोरांवरील दबाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे.

सौदी अरेबियाच्या नागरी विमान वाहतूक प्राधिकरणाने सांगितले की, किंग अब्दुल्ला बिन अब्दुलअजीज आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नजरान आंतरराष्ट्रीय विमानतळावर झालेल्या नुकसानीचे मूल्यांकन करण्यात येत आहे.प्राधिकरणाने सांगितले की, प्रवासी आणि कर्मचाऱ्यांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी तसेच देशाच्या नागरी विमान वाहतूक व्यवस्थेचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक ती पावले उचलली जात आहेत.

हुती बंडखोरांनी दावा केला आहे की, त्यांनी रियाधमधील किंग खालिद आंतरराष्ट्रीय विमानतळ, राबिघ येथील अरामकोच्या तेल शुद्धीकरण प्रकल्पासह आभा आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि खमिस मुशायत येथील एका लष्करी तळावरही हल्ले केले आहेत.या हल्ल्यांमुळे सौदी अरेबिया आणि हुती बंडखोरांमधील संघर्ष आणखी तीव्र झाला आहे. या संघर्षाचा परिणाम आता येमेनच्या सीमांपलीकडे जाऊन सौदी अरेबियाच्या आर्थिक आणि लष्करी पायाभूत सुविधांवरही स्पष्टपणे दिसून येत आहे.

संघर्ष अधिक तीव्र झाल्यानंतर मक्का संरक्षण कराराअंतर्गतही हालचाली वाढल्या आहेत. या करारानुसार सौदी अरेबिया, पाकिस्तान आणि तुर्किये आपल्या सामूहिक संरक्षणाच्या वचनबद्धतेच्या अंमलबजावणीच्या दिशेने पुढे जात आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande