
अबुजा, 06 ऑक्टोबर (हिं.स.)।नायजेरियाच्या दक्षिण भागात मोठी विमान दुर्घटना घडली. सोमवारी (५ ऑक्टोबर) झालेल्या या विमान अपघातात ३२ जणांचा मृत्यू झाला. विमानात ७ क्रू सदस्य आणि २५ प्रवासी होते. हे लष्करी विमान असल्याचे सांगितले जात आहे.ही दुर्घटना ओंडो राज्यातील नदीकाठी वसलेल्या इग्बोकोडा शहरात घडली. या दुर्घटनेबद्दल नायजेरियाचे राष्ट्राध्यक्ष बोला टिनुबू यांनी दुःख व्यक्त केले आहे.
रिपोर्टनुसार, बेनिन सिटीहून लागोसकडे जात असलेल्या नायजेरियन लष्कराच्या या विमानातील एकही प्रवासी बचावला नाही. राष्ट्राध्यक्ष बोला टिनुबू यांनी सांगितले की, दुर्घटना इतकी भीषण होती की यात कोणाचाही जीव वाचू शकला नाही. त्यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त करत विमानातील मृतांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केल्या.
टिनुबू यांनी दुर्घटनेबाबत सांगितले, “वायुसेना प्रमुखांनी मला या घटनेची माहिती दिली आहे. भविष्यात अशा दुर्घटना टाळता याव्यात, यासाठी मी नायजेरियन वायुसेनेला अपघाताच्या कारणांची तातडीने चौकशी सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत.”
नायजेरियाचे विमान वाहतूक आणि हवाई क्षेत्र विकास मंत्री फेस्टस केयामो यांनी सांगितले की, वायुसेनेचे एटीआर-४२ विमान बेनिन सिटीहून लागोसला एका मोहिमेवर जात होते. त्याच वेळी हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाचा विमानाशी संपर्क तुटला. अलिकडच्या काही वर्षांत नायजेरियात झालेल्या सर्वाधिक भीषण विमान दुर्घटनांपैकी ही एक दुर्घटना असल्याचे सांगितले जात आहे.
दुर्घटनेनंतर विमानाचे अवशेष किनारपट्टीवरील इग्बोकोडा शहराजवळ आढळून आले. विमानाच्या अवशेषांचे ठिकाण समजल्यानंतर बचाव पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले. मात्र, कोणालाही वाचवता आले नाही.विमान कोसळण्याच्या वेळी स्थानिक नागरिकांनी विचित्र आवाज ऐकल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांनी विमान झाडांच्या वरून खाली येताना पाहिले. त्यानंतर विमान जमिनीवर कोसळले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode