३० वी लातूर जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धा सुरू; १२५ अधिकारी-अंमलदार मैदानात
लातूर, 08 ऑक्टोबर (हिं.स.)। पोलीस दलातील अधिकारी व अंमलदारांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुदृढ राहावे, कर्तव्याचा ताण काही काळ दूर होऊन त्यांना उत्साह व नवचैतन्य मिळावे, तसेच खेळाडूवृत्ती, संघभावना आणि नेतृत्वगुणांना चालना मिळावी, या उद्देशाने ३०
क्रीडा स्पर्धा


लातूर, 08 ऑक्टोबर (हिं.स.)।

पोलीस दलातील अधिकारी व अंमलदारांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुदृढ राहावे, कर्तव्याचा ताण काही काळ दूर होऊन त्यांना उत्साह व नवचैतन्य मिळावे, तसेच खेळाडूवृत्ती, संघभावना आणि नेतृत्वगुणांना चालना मिळावी, या उद्देशाने ३० वी लातूर जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धा-२०२६ सुरू झाली आहे.

दि. ८ ते १० ऑक्टोबर दरम्यान पोलीस मुख्यालय, लातूर येथील कवायत मैदानावर ही स्पर्धा होत असून, सुमारे १२५ पोलीस अधिकारी, अंमलदार आणि महिला खेळाडूंनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला आहे.

तीन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत ५ हजार मीटर धावणे, २०० मीटर धावणे, गोळाफेक, थाळीफेक आणि लांबउडी या वैयक्तिक क्रीडा प्रकारांसह फुटबॉल, खो-खो, हॅन्डबॉल आणि कबड्डी या सांघिक खेळांचा समावेश आहे. विविध क्रीडा प्रकारांमधील सामन्यांमुळे पोलीस मुख्यालयाचे कवायत मैदान क्रीडा उत्साहाने गजबजणार आहे.

कर्तव्याच्या ताणातून क्रीडेतून मिळणार नवी ऊर्जा

कायदा-सुव्यवस्था, गुन्हे प्रतिबंध, तपास, बंदोबस्त तसेच विविध सामाजिक जबाबदाऱ्या पार पाडताना पोलीस अधिकारी व अंमलदारांना मानसिक आणि शारीरिक ताणाला सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत क्रीडा हा शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच मानसिक प्रसन्नता आणि सकारात्मक ऊर्जा देणारे प्रभावी माध्यम ठरते.

पोलीस दलातील अधिकारी व अंमलदारांना नियमित व्यायाम आणि क्रीडेकडे वळण्यासाठी या स्पर्धेतून प्रोत्साहन दिले जात आहे. स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंची पुढील स्तरावरील पोलीस क्रीडा स्पर्धेसाठी निवड केली जाणार आहे.

त्यामुळे लातूर जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धा ही केवळ पदक आणि विजेतेपदासाठीची स्पर्धा न राहता, जिल्ह्यातील गुणवंत पोलीस खेळाडूंना पुढील स्तरावर आपले क्रीडा कौशल्य सिद्ध करण्याची संधी देणारे व्यासपीठ ठरणार आहे.

‘सुदृढ पोलीस दल, सक्षम पोलीस दल’ या भावनेला बळ देणाऱ्या या स्पर्धेत अधिकारी, अंमलदार आणि महिला खेळाडूंचा उत्स्फूर्त सहभाग असून, पुढील तीन दिवस लातूर पोलिसांच्या मैदानावर जिद्द, शिस्त, संघभावना आणि क्रीडा कौशल्याचा रोमांचक संगम पाहायला मिळणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande