राहुल गांधींवरील कारवाई विरोधात नाशकात निदर्शने
Protests against action against Rahul Gandhi
राहुल गांधींवरील कारवाई विरोधात नाशकात निदर्शने


घोषणाबाजी करत मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी

नाशिक, 08 ऑक्टोबर (हिं.स.)।

: विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह इंडिया आघाडीच्या खासदारांना अडवून पोलिसांनी केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ नाशिक शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने बुधवारी 'भारतीय लोकशाहीसाठी काळा दिवस पाळण्यात आला. शहराध्यक्ष नीलेश (बबलू) खैरे यांच्या नेतृत्वाखाली शिवाजी रोडवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ निदर्शने करण्यात आली.

निवडणूक आयोगाकडून उत्तरदायित्वाची मागणी करण्यासाठी राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली इंडिया आघाडीचे खासदार शांततेच्या मार्गाने जंतर-मंतरकडे जात असताना त्यांना रोखण्यात आले. यावेळी पोलिसांनी बळाचा वापर करून राहुल गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, प्रियंका गांधी यांच्यासह ज्येष्ठ नेते व

खासदारांशी अमानुष वर्तन केल्याचा आरोप काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केला. विरोधी पक्षनेते व जनतेने निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींवर झालेली कारवाई हा भारतीय संविधान आणि लोकशाहीवरील हल्ला असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटवून निवडणूक व्यवस्थेची अखंडता पुनर्स्थापित होईपर्यंत काँग्रेसचा लढा सुरूच राहील, असा निर्धार व्यक्त करण्यात आला.

आंदोलनादरम्यान 'ज्ञानेश कुमार राजीनामा द्या', 'वोट चोर, गद्दी छोड', 'भारतीय संविधानाचा विजय असो' अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला

यावेळी प्रा. ज्ञानेश्वर गायकवाड, अविनाश उमणकर, ज्ञानेश्वर काळे, रमेश जाधव, उल्हास सातभाई, स्वाती जाधव, जयेश पोकळे, सुदेश मोरे, जाकीर अत्तार, भारत पाटील, हर्षल पवार यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI


 rajesh pande