
परभणी, 08 ऑक्टोबर, (हिं.स.)। सेवा संकल्प अभियानांतर्गत खरदडी आणि पिंपळगाव (ता. जिंतूर) येथे आरोग्य तपासणी शिबिर संपन्न झाले. या शिबिरात नागरिकांची उच्च रक्तदाब व रक्तातील साखरेची तपासणी करण्यात आली. तसेच गरोदर मातांची आरोग्य तपासणी करून त्यांना आवश्यक आरोग्यविषयक मार्गदर्शन व सल्ला देण्यात आला.
‘तिशीचा पल्ला, आरोग्य अन् सल्ला’ या उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांनी नियमित आरोग्य तपासणी करण्याचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. उच्च रक्तदाब व मधुमेहाचे वेळेवर निदान झाल्यास योग्य उपचार आणि जीवनशैलीतील बदलांद्वारे संभाव्य गुंतागुंत टाळता येते, याबाबत आरोग्य कर्मचाऱ्यांनी मार्गदर्शन केले.खरदडी येथे ३० वर्षांवरील नागरिकांची तपासणी तसेच गरोदर मातांची आवश्यक आरोग्य तपासणी करण्यात आली. तर ग्रामपंचायत पिंपळगाव येथेही सेवा संकल्प अभियानांतर्गत आरोग्य शिबिर घेऊन ग्रामस्थांची आरोग्य तपासणी करण्यात आली.गरोदर मातांना सकस आहार, नियमित तपासणी, औषधोपचार आणि माता-बाल आरोग्याबाबत आवश्यक सूचना देण्यात आल्या. ग्रामस्थांनी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद देत आरोग्य तपासणी करून घेतली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis