परभणीत शॉर्टसर्किटने दीड एकर ऊस जळून खाक
परभणी, 08 ऑक्टोबर (हिं.स.)। पाथरी तालुक्यातील निवळी शिवारात शेतातून गेलेल्या महावितरणच्या मुख्य वीजवाहिनीमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने दीड एकर क्षेत्रातील उभ्या ऊसाला आग लागून मोठे नुकसान झाले. निवळी येथील शेतकरी नारायण लिपणे यांची गट क्रमांक ४९ मध्य
परभणीत शॉर्टसर्किटने दीड एकर ऊस जळून खाक


परभणी, 08 ऑक्टोबर (हिं.स.)।

पाथरी तालुक्यातील निवळी शिवारात शेतातून गेलेल्या महावितरणच्या मुख्य वीजवाहिनीमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने दीड एकर क्षेत्रातील उभ्या ऊसाला आग लागून मोठे नुकसान झाले. निवळी येथील शेतकरी नारायण लिपणे यांची गट क्रमांक ४९ मध्ये शेती असून, त्यापैकी दीड एकर क्षेत्रात त्यांनी ऊसाची लागवड केली होती. गुरुवारी पहाटेच्या सुमारास शेतातून गेलेल्या मुख्य वीजवाहिनीमध्ये अचानक शॉर्टसर्किट होऊन ठिणग्या ऊसाच्या पिकावर पडल्या. त्यामुळे उभ्या ऊसाला आग लागली. स्थानिक शेतकरी व ग्रामस्थांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला; मात्र तोपर्यंत संपूर्ण दीड एकर क्षेत्रातील ऊस जळून खाक झाला. ऊस काढणीच्या तोंडावरच पीक जळाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा लिपणे यांनी केला आहे. दुष्काळसदृश परिस्थितीत आधीच आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असताना या नुकसानीमुळे संकट अधिक वाढले असून मानसिक तणावही वाढल्याचे त्यांनी पाथरी येथील महावितरणच्या उपअभियंता कार्यालयाला दिलेल्या अर्जात नमूद केले आहे. महावितरणच्या संबंधित अधिकारी व कर्मचार्यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी करावी, नुकसानीचा अधिकृत पंचनामा करावा आणि नियमानुसार योग्य ती नुकसानभरपाई मंजूर करावी, अशी मागणी शेतकरी नारायण लिपणे यांनी केली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande