
परभणी, 08 ऑक्टोबर, (हिं.स.)। कमी पाऊस आणि निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आगामी काळात पाणीटंचाईचे संकट अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करून उपलब्ध जलसाठ्यांचे संरक्षण करावे, असे आवाहन उपविभागीय दंडाधिकारी शैलेश लाहोटी यांनी केले आहे.
जिंतूर व सेलू उपविभागातील सार्वजनिक जलसाठ्यांवर प्रशासनाचे विशेष लक्ष असून, पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत आहे. उपलब्ध पाणीसाठ्याचा अनावश्यक उपसा अथवा अपव्यय होऊ नये, यासाठी प्रशासनाकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. सार्वजनिक जलसाठ्यांमधून अनधिकृतपणे पाणीउपसा करण्यास मनाई करण्यात आली असून, आदेशाचे उल्लंघन करणार्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे. पाण्याचा प्रत्येक थेंब भविष्यासाठी महत्त्वाचा असल्याने घरगुती वापरात पाण्याचा अपव्यय टाळणे गरजेचे आहे. नळ सुरू ठेवून पाणी वाया घालवू नये, पावसाचे पाणी साठवावे, उपलब्ध जलस्रोतांचे संवर्धन करावे तसेच शेतीमध्येही पाण्याचा काटकसरीने वापर करावा. नागरिक, शेतकरी आणि प्रशासनाने एकत्रितपणे जलसंधारणाला प्राधान्य दिल्यास संभाव्य पाणीटंचाईचा सामना करणे शक्य होईल. जिंतूर तालुक्यात यापूर्वीही पाणीटंचाई निर्माण झाल्यानंतर टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ प्रशासनावर आली होती. त्यामुळे भविष्यातील संभाव्य संकट लक्षात घेता आतापासूनच पाण्याचे योग्य नियोजन आणि संवर्धन करणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis