जि. प. अध्यक्षांच्या घरी झालेल्या चोरीच्या गुन्ह्याचा छडा लावण्यात लातूर पोलिसांना यश
लातूर, 09 ऑक्टोबर (हिं.स.)। लातूर शहरातील शासकीय निवासस्थानी जिल्हा परिषद अध्यक्षांच्या घरफोडीच्या गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कौशल्यपूर्ण तपासाद्वारे छडा लावला आहे. मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यात तब्बल पाच ते सहा दिवस वेशांतर करून, ग
पोलीस कारवाई


लातूर, 09 ऑक्टोबर (हिं.स.)। लातूर शहरातील शासकीय निवासस्थानी जिल्हा परिषद अध्यक्षांच्या घरफोडीच्या गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कौशल्यपूर्ण तपासाद्वारे छडा लावला आहे. मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यात तब्बल पाच ते सहा दिवस वेशांतर करून, गोपनीय माहितीचे जाळे सक्रिय ठेवत आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपासाची चक्रे फिरवून पोलिसांनी एका परप्रांतीय आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडून चोरीच्या गुन्ह्यातील १ लाख ७० हजार रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.

एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ६५०/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३३१(३), ३३१(४) व ३०५(अ) प्रमाणे घरफोडी व चोरीचा गुन्हा दाखल होता. पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या निर्देशावर, अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांचे मार्गदर्शनात या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरू होता.पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गुन्ह्याचा तपास करीत असताना, मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यात तपासाची दिशा निश्चित करण्यात आली. पथकाने वेशांतर करून सलग पाच ते सहा दिवस गोपनीय यंत्रणेच्या माध्यमातून माहिती संकलित केली. तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे नमूद गुन्ह्यातील संशयित आरोपी

१) आलम सुरसिंग भुरिया (वय ४० वर्षे, रा. गुराडिया, तहसील कुक्षी, जिल्हा धार, मध्य प्रदेश)

याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे ५०० रुपयांच्या ३४० नोटा, अशी एकूण १ लाख ७० हजार रुपयांची रोख रक्कम मिळून आली. प्राथमिक चौकशीत आरोपीने आपल्या साथीदारासह सुमारे वीस दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील वसाहतीत एका बंद घरात घरफोडी करून रोख रक्कम व सोन्याचे दागिने चोरल्याची माहिती दिल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. उर्वरित रोख रक्कम व सोन्याचे दागिने साथीदाराकडे असल्याचेही त्याने सांगितले. या प्रकरणातील दुसरा आरोपी रमेश हा फरार असून त्याचा शोध सुरू आहे. जप्त करण्यात आलेली रोख रक्कम व आरोपीला पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी एमआयडीसी पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे व अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वात सहायक पोलीस निरीक्षक पांडुरंग माने, अमित कुमार पुणेकर, पोलीस अंमलदार युवराज गिरी, नवनाथ हासबे, तुराब पठाण, मोहन सुरवसे, प्रदीप स्वामी, विनोद चलवाड, पोलीस अंमलदार राहुल कांबळे, गणेश साठे, जमीर शेख, गोविंद यलमटे, प्रेमदास राठोड, पाराजी पुट्टेवाड व शैलेश सुडे, सुहास जाधव गोरोबा इंगोले, अंकुश बिराजदार, गणेश बोमणे दयानंद सूर्यवंशी यांनी सहभाग घेतला.

वेशांतर, गोपनीय माहितीचे संकलन आणि तांत्रिक विश्लेषण यांच्या प्रभावी समन्वयातून जिल्हा परिषद अध्यक्षांच्या घरफोडीच्या गुन्ह्याचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले असून, फरार साथीदाराचा शोध घेऊन उर्वरित मुद्देमाल हस्तगत करण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande