भारतीय वंशाच्या नवी पिल्लई यांना नोबेल शांतता पुरस्कार जाहीर
स्टॉकहोम, 09 ऑक्टोबर (हिं.स.)। दक्षिण आफ्रिकेच्या भारतीय वंशाच्या नागरिक नवनेथम ‘नवी’ पिल्लई यांना नोबेल शांतता पुरस्कार मिळाला आहे. शांतता आणि आंतरराष्ट्रीय कायद्याला प्रोत्साहन देण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची दखल घेत नॉर्वेजियन नोबेल समितीने नवन
भारतीय वंशाच्या नवी पिल्लई यांना मिळाला २०२६ चा नोबेल शांतता पुरस्कार


स्टॉकहोम, 09 ऑक्टोबर (हिं.स.)।

दक्षिण आफ्रिकेच्या भारतीय वंशाच्या नागरिक नवनेथम ‘नवी’ पिल्लई यांना नोबेल शांतता पुरस्कार मिळाला आहे. शांतता आणि आंतरराष्ट्रीय कायद्याला प्रोत्साहन देण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची दखल घेत नॉर्वेजियन नोबेल समितीने नवनेथम ‘नवी’ पिल्लई यांना २०२६ चा नोबेल शांतता पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला आहे.

नोबेल शांतता पुरस्कारासाठी नवी पिल्लई यांच्या नावाची घोषणा करताना समितीने म्हटले की, त्यांचे कार्य शांततापूर्ण मार्गाने वाद सोडवणे, शक्तिशाली देश आणि व्यक्तींना त्यांच्या कृतींसाठी जबाबदार धरणे तसेच पीडितांचे संरक्षण करण्यात आंतरराष्ट्रीय कायद्याचे महत्त्व अधोरेखित करते.

भारतीय वंशाच्या तमिळ कुटुंबात जन्मलेल्या नवी पिल्लई यांनी एक अग्रगण्य वकील आणि कायदेतज्ज्ञ म्हणून आपली ओळख निर्माण केली. त्यांचा जन्म २३ सप्टेंबर १९४१ रोजी दक्षिण आफ्रिकेतील डर्बन येथे झाला. त्या काळात दक्षिण आफ्रिकेत वर्णभेदाच्या आधारे लोकांशी भेदभाव केला जात होता. सध्या ८५ वर्षांच्या असलेल्या नवी पिल्लई यांची अत्यंत गुंतागुंतीची प्रकरणेही शांततेच्या मार्गाने सोडवण्याची क्षमता विशेष उल्लेखनीय मानली जाते. त्यांच्या याच कार्याची दखल घेत नोबेल समितीने त्यांना शांततेसाठीचा सर्वोच्च पुरस्कार प्रदान करण्याचा निर्णय घेतला आहे.

नवी पिल्लई यांनी दक्षिण आफ्रिकेच्या उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून काम केले आहे. तसेच रवांडासाठीच्या आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायाधिकरणात, आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालयात आणि संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार उच्चायुक्तपदीही त्यांनी महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत.

नोबेल पुरस्कार विजेत्या नवी पिल्लई यांनी इस्रायलच्या ताब्यातील पॅलेस्टिनी प्रदेशांबाबत स्थापन करण्यात आलेल्या संयुक्त राष्ट्रांच्या चौकशी आयोगाचे अध्यक्षपदही भूषवले आहे. म्यानमारमधील नरसंहाराच्या आरोपांशी संबंधित प्रकरणात त्या आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या न्यायाधीश आहेत.बलात्कार, लैंगिक हिंसाचार आणि मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांना आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार गुन्हे म्हणून मान्यता देणाऱ्या महत्त्वपूर्ण निर्णयांमध्ये पिल्लई यांनी मोलाची भूमिका बजावली आहे. तसेच प्रचाराच्या माध्यमातून हिंसाचाराला चिथावणी देण्याच्या प्रकरणांमध्ये कायदेशीर कारवाई करण्यासाठीही त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande