
रायगड, 01 नोव्हेंबर (हिं.स.)। प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांवरील कारवाईत प्रशासकीय अनियमितता झाल्याच्या आरोपांवरून राज्य शासनाने अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) चार अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे. तर अन्य २१ अधिकाऱ्यांविरुद्ध विभागीय चौकशी सुरू करण्यात आली आहे. ठाणे आणि मावळ येथील दोन कंपन्यांवरील कारवाईच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिली.
ठाण्यातील हायस्ट्रीट इम्पेक्स एलएलपी आणि मावळ तालुक्यातील सोएक्स इंडिया प्रा. लि. या कंपन्यांवरील कारवाईत अनियमितता झाल्याचा ठपका चौकशीत ठेवण्यात आला आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या माध्यमातून या प्रकरणांची चौकशी करण्यात आली. त्यानंतर ३० ऑक्टोबर रोजी निलंबनाचे आदेश जारी करण्यात आले.
निलंबित अधिकाऱ्यांमध्ये अन्न सहआयुक्त दिगंबर भोगावडे, सहायक आयुक्त यदुराज दहातोंडे आणि अन्न सुरक्षा अधिकारी अशोक इलागेर व सी. आर. स्वामी यांचा समावेश आहे.मावळ तालुक्यातील टाकवे येथील सोएक्स इंडिया कंपनीवर २ जानेवारी २०२६ रोजी केलेल्या कारवाईत ५ लाख ४८ हजार ४८८ किलो प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला होता. त्याची किंमत ३१ कोटी ६७ लाख २१ हजार ९८७ रुपये होती. कंपनीचे आस्थापनही सील करण्यात आले होते.
हायस्ट्रीट इम्पेक्स प्रकरणात उत्पादनाच्या वापरासंबंधीच्या सूचनांकडे दुर्लक्ष करून कारवाई केल्याचा मुद्दा चौकशी अहवालात नमूद आहे. तसेच अधिकाऱ्यांवर कारवाईसाठी दबाव आणल्याचाही उल्लेख आहे. संबंधित प्रकरणांत अधिकाऱ्यांची भूमिका आणि कारवाईची कायदेशीर वैधता तपासली जाणार असल्याचे मंत्र्यांनी स्पष्ट केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)