बांगलादेशात वस्त्रोद्योग कामगारांचे आंदोलन चिघळले; पोलिसांवर दगडफेक, वाहनांची जाळपोळ
ढाका, 01 नोव्हेंबर (हिं.स.)।बांगलादेशात पुन्हा एकदा हिंसाचाराचा उद्रेक झाला आहे. वेतनवाढीच्या मागणीसाठी वस्त्रोद्योग कारखान्यांमधील कामगारांनी केलेले आंदोलन हिंसक बनले आहे. ढाका आणि गाझीपूर येथे तोडफोड तसेच पोलिसांशी झालेल्या चकमकींच्या घटना समोर आ
बांगलादेशात वस्त्रोद्योग कामगारांचे आंदोलन चिघळले; पोलिसांवर दगडफेक, वाहनांची जाळपोळ


ढाका, 01 नोव्हेंबर (हिं.स.)।बांगलादेशात पुन्हा एकदा हिंसाचाराचा उद्रेक झाला आहे. वेतनवाढीच्या मागणीसाठी वस्त्रोद्योग कारखान्यांमधील कामगारांनी केलेले आंदोलन हिंसक बनले आहे. ढाका आणि गाझीपूर येथे तोडफोड तसेच पोलिसांशी झालेल्या चकमकींच्या घटना समोर आल्या आहेत. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाने पोलिसांसह बॉर्डर गार्ड बांगलादेशच्या (बीजीबी) जवानांनाही तैनात केले आहे.

आंदोलकांनी कथितपणे पोलीस चौक्यांची तोडफोड केली असून पोलिसांच्या वाहनांना आग लावली आहे. याशिवाय कारखान्यांमध्ये तोडफोड, पोलीस चौक्यांवर दगडफेक आणि प्रमुख रस्त्यांवर अडथळे निर्माण करून वाहतूक रोखण्याचे प्रकार घडले आहेत. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. काही ठिकाणी साउंड ग्रेनेडचाही वापर करण्यात आला.शनिवारी सुरू झालेला हा हिंसाचार रविवारी ढाक्यातील मीरपूर आणि गाझीपूरमधील कोनाबाडी यांसारख्या औद्योगिक भागांमध्ये पसरला. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांसोबतच बीजीबीच्या तुकड्याही तैनात करण्यात आल्या आहेत.

सध्या बांगलादेशातील वस्त्रोद्योग कामगारांचे किमान मासिक वेतन १२ हजार ५०० टका आहे. मात्र, हे वेतन वाढवून ३० हजार टका करण्यात यावे, अशी कामगारांची मागणी आहे. वास्तविक, बांगलादेश सरकारने अलीकडेच सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नवीन वेतनश्रेणी जाहीर केली आहे. त्यानुसार सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात आणि भत्त्यांमध्ये जवळपास दुपटीने वाढ करण्यात आली आहे. यानंतर वस्त्रोद्योग कामगारांनीही वेतनवाढीची मागणी लावून धरली आहे. किमान मासिक वेतन ३० हजार टका निश्चित करावे, अशी त्यांची प्रमुख मागणी आहे.मात्र, वस्त्रोद्योग कारखान्यांच्या मालकांचे म्हणणे आहे की, त्यांना पूर्वीच्या तुलनेत कमी ऑर्डर मिळत आहेत. तसेच तयार उत्पादनांच्या किमतींमध्येही वाढ झालेली नाही. त्यातच कच्च्या मालाच्या आयातीचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे कामगारांच्या वेतनवाढीची मागणी पूर्ण करणे कठीण असल्याचे कारखानदारांचे म्हणणे आहे.

दरम्यान, वस्त्रोद्योग कामगारांमधील वाढता असंतोष लक्षात घेऊन बांगलादेश सरकारने त्यांच्या वेतनात सुधारणा करण्यासाठी वेतन मंडळाची स्थापना केली आहे. मात्र, वेतन मंडळ स्थापन होऊनही कामगारांचे आंदोलन सुरूच आहे. आपल्या मागण्यांच्या समर्थनार्थ कामगार रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत.बांगलादेशातील तयार कपड्यांच्या उद्योगाची सुरुवात १९७० च्या दशकाच्या अखेरीस आणि १९८० च्या दशकाच्या सुरुवातीला झाली. त्यानंतर अल्प निर्यात क्षेत्र म्हणून सुरू झालेला हा उद्योग आज देशाच्या अर्थव्यवस्थेचा सर्वात मोठा आधारस्तंभ बनला आहे.

आज बांगलादेश हा जगातील सर्वात मोठ्या तयार कपड्यांच्या निर्यातदार देशांपैकी एक आहे. देशाच्या एकूण निर्यातीमध्ये या उद्योगाचा वाटा ८० टक्क्यांहून अधिक आहे. या क्षेत्रात सुमारे ४० लाख लोक थेट काम करतात. त्यापैकी जवळपास ६० ते ७० टक्के महिला आहेत.या उद्योगाने देशातील महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्यासोबतच त्यांची सामाजिक स्थिती सुधारण्यातही महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande