
बर्लिन, 02 नोव्हेंबर (हिं.स.)।जर्मनीमध्ये तरुणांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेल्या देशव्यापी आंदोलनादरम्यान अनेक शहरांमध्ये हिंसाचार आणि लुटालूट झाल्याच्या घटनांचा राजकीय नेत्यांनी तीव्र निषेध केला आहे. मात्र, या हिंसक घटनांमुळे तरुणांच्या रास्त मागण्यांकडे दुर्लक्ष होता कामा नये, असे मतही अनेक नेत्यांनी व्यक्त केले आहे.
हेस्से राज्याचे मुख्यमंत्री बोरिस राइन यांनी समाजमाध्यम मंच ‘एक्स’वर पोस्ट करत अशा प्रकारच्या हिंसक घटना पूर्णपणे अस्वीकार्य असल्याचे म्हटले आहे. जर्मनीचे गृहमंत्री अलेक्झांडर डोब्रिंट यांनी या हिंसाचारासाठी डाव्या विचारसरणीचे कट्टरतावादी गट आणि स्थलांतरित समुदायातील उपद्रवींना जबाबदार धरले. मात्र, पॅरिसमध्ये झालेल्या हिंसाचाराइतकी जर्मनीतील परिस्थिती गंभीर नव्हती, असेही त्यांनी स्पष्ट केले. उजव्या विचारसरणीच्या एएफडी पक्षानेही या हिंसाचारासाठी डाव्या विचारसरणीचा कट्टरतावाद आणि अनियंत्रित स्थलांतराला जबाबदार ठरवले.
दुसरीकडे, डाव्या विचारसरणीच्या ‘डाय लिंके’ पक्षाच्या प्रमुख इनेस श्वेर्डटनर यांनी काही उपद्रवींनी केलेल्या तोडफोडीमुळे शांततेत आंदोलन करणाऱ्या तरुणांच्या मागण्यांचे महत्त्व कमी होत नाही, असे म्हटले आहे.तर, ग्रीन्स पक्षाच्या सहप्रमुख फ्रान्झिस्का ब्रांटनर यांनी हिंसाचारामुळे शांततेत आंदोलन करणाऱ्या हजारो तरुणांच्या रास्त मागण्यांना धक्का बसल्याचे मत व्यक्त केले.
शनिवारी ‘जेनझेड रेगेल्ट!’ या संघटनेच्या आवाहनानंतर हजारो तरुण रस्त्यावर उतरले. वाढती महागाई आणि जीवनावश्यक खर्च, शिक्षणावरील खर्चात वाढ तसेच अर्थसंकल्पातील कपातींना विरोध या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. फ्रान्स आणि इटलीमध्ये अलीकडेच झालेल्या अशाच प्रकारच्या आंदोलनांपासून प्रेरणा घेऊन जर्मनीतील तरुणांनी हे आंदोलन उभारले होते.सुरुवातीला शांततेत सुरू असलेल्या या आंदोलनाला फ्रँकफुर्टमध्ये हिंसक वळण लागले. येथे मुखवटे घातलेल्या काही उपद्रवींनी अनेक दुकानांची तोडफोड करून लुटालूट केली. याशिवाय बर्लिन, कोलोन आणि हॅम्बुर्ग यांसारख्या प्रमुख शहरांमध्येही हिंसक झटापटी झाल्या.काही ठिकाणी आंदोलकांनी पेट्रोल बॉम्ब फेकले. त्याला प्रत्युत्तर म्हणून जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना पाण्याच्या तोफांचा वापर करावा लागला.
दरम्यान, ‘जेनझेड रेगेल्ट!’ या संघटनेने आपल्या संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार, हे आंदोलन केवळ सुरुवात आहे. संघटनेने येत्या १४ नोव्हेंबर रोजी पुन्हा एकदा देशव्यापी आंदोलन करण्याचे आवाहन केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode