
कीव, 02 नोव्हेंबर (हिं.स.)।रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांनी आपापल्या आपत्कालीन सूचना यंत्रणांवर सायबर हल्ले झाल्याची माहिती दिली आहे. दोन्ही देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर युक्रेनमध्ये रासायनिक आणि किरणोत्सर्गाच्या धोक्याबाबत खोटे इशारे पसरवण्यात आले. तसेच, रशिया सरकारच्या एका मोबाईल ॲप्लिकेशनच्या माध्यमातून सार्वजनिक सुरक्षेशी संबंधित चुकीची माहिती प्रसारित करण्यात आली.
मिळालेल्या वृत्तानुसार, युक्रेनच्या ‘एअर रेड अलर्ट सिस्टिम’मध्ये हॅकर्सनी घुसखोरी केली. त्यामुळे संपूर्ण देशातील नागरिकांच्या मोबाईलवर रासायनिक आणि किरणोत्सर्गाच्या कथित धोक्याबाबत इशारे पाठवण्यात आले. एवढेच नव्हे, तर ध्वनिक्षेपकांद्वारे इशारे देणाऱ्या यंत्रणेतही छेडछाड करण्यात आली. त्यामुळे कीवच्या रस्त्यांवरही अशाच प्रकारचे संदेश प्रसारित करण्यात आले.या घटनेत बाहेरील घटकांचा हस्तक्षेप असण्याची शक्यता युक्रेनच्या हवाई दलाने व्यक्त केली आहे. तसेच, नागरिकांना किरणोत्सर्गाचा कोणताही धोका नसल्याचे सांगत घाबरून न जाण्याचे आवाहन केले आहे.
युक्रेनच्या हवाई दलाने टेलिग्रामवर म्हटले की, ‘कृपया लक्ष द्या. एअर अलर्ट ॲपमध्ये छेडछाड झाल्याची शक्यता आहे.’ पुढे त्यांनी स्पष्ट केले की, ‘किरणोत्सर्गाचा कोणताही धोका नाही. घाबरू नका आणि आमच्या अधिकृत माध्यमांवर प्रसिद्ध होणाऱ्या माहितीवर लक्ष ठेवा.’दरम्यान, युक्रेनच्या डिजिटल परिवर्तन मंत्रालयाने नंतर ‘एक्स’वर पोस्ट करत देशव्यापी इशारा यंत्रणा सामान्यपणे कार्यरत असल्याचे स्पष्ट केले. मंत्रालयाने म्हटले की, संपूर्ण देशातील अलर्ट यंत्रणा नेहमीप्रमाणे सुरू आहे. धोक्याचे सर्व संकेत प्रादेशिक प्रशासनाकडे पाठवले जातात आणि तेथून सार्वजनिक इशारा यंत्रणेद्वारे नागरिकांपर्यंत पोहोचवले जातात.
ही घटना अशा वेळी घडली आहे, जेव्हा युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी ऊर्जा क्षेत्रातील युद्धविरामाची मागणी केली आहे. सुरू असलेल्या युद्धाचा जागतिक ऊर्जा किमतींवर काय परिणाम होत आहे, याचा विचार करण्याचे आवाहन त्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना केले आहे.माध्यमांशी बोलताना झेलेन्स्की म्हणाले, ‘या युद्धाचा ऊर्जा किमतींवर परिणाम होत असल्याचे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना वाटत असेल, तर ते ऊर्जा क्षेत्रातील युद्धविरामाची मागणी करू शकतात.’
दरम्यान, रशियाच्या आपत्कालीन परिस्थिती मंत्रालयाने त्यांच्या मोबाईल ॲप्लिकेशनवर मोठा सायबर हल्ला झाल्याची माहिती दिली आहे. या हल्ल्यामुळे नागरिकांमध्ये संभाव्य धोक्यांबाबत चुकीची माहिती पसरवण्यात आल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे.
मंत्रालयाने निवेदनात सांगितले की, रशियाच्या आपत्कालीन परिस्थिती मंत्रालयाच्या मोबाईल ॲपवर मोठा सायबर हल्ला झाला. या माध्यमातून हल्लेखोरांनी नागरिकांमध्ये खोटी माहिती पसरवली.वृत्तसंस्थेनुसार, ॲपमधील त्रुटी दूर करून ते पुन्हा सुरळीतपणे कार्यान्वित करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.रशिया-युक्रेन युद्धासंदर्भात राजनैतिक आणि मानवतावादी पातळीवर प्रयत्न सुरू असतानाच या सायबर हल्ल्यांच्या घटना घडल्या आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode