
वॉशिंग्टन, 02 नोव्हेंबर (हिं.स.)।अमेरिकेच्या प्रथम महिला मेलानिया ट्रम्प यांनी रशिया आणि युक्रेन दरम्यान ओलेश्की येथे झालेल्या मानवतावादी युद्धविरामादरम्यान सहकार्य केल्याबद्दल दोन्ही देशांचे कौतुक केले आहे. पाच दिवसांच्या या करारामुळे संघर्षग्रस्त भागात आवश्यक मदतसामग्री पोहोचवण्यात आली असून, सुमारे ८०० नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
मेलानिया यांनी रविवारी समाजमाध्यम मंच ‘एक्स’वर पोस्ट करत सांगितले की, २७ ऑक्टोबर रोजी सुरू झालेला हा युद्धविराम नियोजित वेळापत्रकानुसार १ नोव्हेंबर रोजी संपला. यापूर्वी मेलानिया यांनी हा मानवतावादी करार ओलेश्की आणि आसपासच्या खेरसॉन भागातील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा असल्याचे म्हटले होते. या करारांतर्गत नागरिकांना अन्न, स्वच्छ पाणी आणि औषधे उपलब्ध करून देण्यात आली. तसेच सततच्या हल्ल्यांचा धोका न पत्करता सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याची संधीही मिळाली.
युक्रेनच्या संसदेचे आयुक्त दिमित्रो लुबिनेट्स आणि रशियाच्या मानवाधिकार आयुक्त याना लांत्रातोवा यांच्यात झालेल्या चर्चेनंतर स्थानिक पातळीवर हा युद्धविराम घडवून आणण्यात आला होता. या प्रक्रियेत अमेरिकेच्या प्रथम महिला मेलानिया ट्रम्प यांनी मध्यस्थी केली होती.
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी या मध्यस्थीच्या प्रयत्नांबद्दल मेलानिया यांचे आभार मानले होते. युद्धविरामादरम्यान ओलेश्कीकडे जाणाऱ्या रस्त्यांवरील भूसुरुंग हटवण्यात आल्या आणि तेथे मानवतावादी मदत पोहोचवण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले होते.
झेलेन्स्की यांनी पुढे सांगितले की, ज्या नागरिकांना तेथून बाहेर काढण्याची गरज होती, त्यांना शहरातून आणि आसपासच्या भागांतून सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. त्यानंतर युक्रेनचे नागरिक चेर्निहिव्ह भागातून युक्रेनमध्ये दाखल झाले.
दरम्यान, क्रेमलिनचे निकटवर्तीय युरी उशाकोव्ह यांनी म्हटले आहे की, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्याशी चर्चा करण्यास कधीही नकार दिलेला नाही.
वृत्तानुसार, उशाकोव्ह म्हणाले, “माझ्या मते, ते नक्कीच उत्तर देतील. पुतिन यांनी चर्चेसाठी कधीही नकार दिलेला नाही.” झेलेन्स्की यांना खरोखरच चर्चा करायची असेल, तर ते मॉस्को येथे येऊ शकतात, असेही उशाकोव्ह यांनी स्पष्ट केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode