
वॉशिंग्टन , 02 नोव्हेंबर (हिं.स.)।अमेरिकेतील फ्लोरिडा येथे रविवारी मोठा विमान अपघात घडला. नऊ जणांना घेऊन जाणारे एक खासगी व्यावसायिक विमान निवासी भागात कोसळले. या दुर्घटनेत विमानातील सर्व नऊ जणांचा मृत्यू झाला. अमेरिकेचे परिवहन मंत्री सीन डफी यांनी रविवारी या वृत्ताला दुजोरा दिला.हे विमान टेक्सासमधील ऑस्टिन येथून उड्डाण करून बहामासच्या दिशेने जात होते. मात्र, अपघाताचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.
अपघातग्रस्त विमान ‘लिअरजेट-६०’ प्रकारातील होते. दक्षिण फ्लोरिडातील निवासी भागावरून जात असताना हे विमान अचानक खाली आले आणि रस्त्यालगत मोठ्या आवाजासह कोसळले. धडकेनंतर विमानाला भीषण आग लागली. आकाशात आगीचा मोठा गोळा दिसून आला. विमान रस्त्याजवळ कोसळल्याने जमिनीवर मोठा खड्डा पडला. घटनास्थळी आगीच्या ज्वाळा आणि काळ्या धुराचे लोट पसरले होते.
हा अपघात मिलिटरी ट्रेल आणि १०व्या अव्हेन्यू नॉर्थजवळ घडला. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान आणि इतर आपत्कालीन पथके घटनास्थळी दाखल झाली. सुरक्षेच्या कारणास्तव पाम बीच काउंटी शेरीफ कार्यालयाने रस्त्याच्या दोन्ही बाजूंची वाहतूक बंद केली. तसेच वाहनचालकांना या परिसरात जाणे टाळण्याचे आवाहन केले.
अमेरिकेचे परिवहन मंत्री शॉन डफी यांनी दिलेल्या माहितीनुसार, विमानातील सर्व नऊ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. बहामासच्या दिशेने जाणारे ‘लिअरजेट ६०’ हे खासगी विमान पाम बीच काउंटीतील ग्रीनएकर्स येथे कोसळले. सुदैवाने, विमानाची जवळच्या घरांना किंवा रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांना धडक बसली नाही. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, एखादे क्षेपणास्त्र कोसळल्यासारखे दृश्य होते. या अपघातामुळे रस्त्याच्या कडेला मोठा खड्डा पडला असून संपूर्ण परिसर आगीच्या ज्वाळा आणि काळ्या धुराच्या दाट लोटांनी व्यापला होता.
हवाई वाहतूक नियंत्रण कक्षातील (एअर ट्रॅफिक कंट्रोल) संभाषणाच्या ध्वनिमुद्रणातून विमानाच्या उड्डाणाच्या शेवटच्या क्षणांतील भयावह परिस्थिती समोर आली आहे. वैमानिकाने हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाला खराब होत असलेल्या हवामानाची माहिती दिली होती. विमानाला हवेतील तीव्र अस्थिरतेचा (टर्ब्युलन्स) सामना करावा लागत असून विमानावर बर्फ साचत असल्याचेही त्याने सांगितले होते. त्यानंतर वैमानिकाने मदतीसाठी आपत्कालीन संदेश (डिस्ट्रेस कॉल) जारी केला.सुरुवातीला वैमानिकाने हवाई वाहतूक नियंत्रकांना सांगितले होते की, ‘विमानावर हलक्या स्वरूपाचा पारदर्शक बर्फ साचला आहे. मात्र, परिस्थिती नियंत्रणात आहे. तसेच विमानाला थोड्या प्रमाणात हवेतील अस्थिरतेचा सामना करावा लागत आहे.’
यानंतर हवामान आणखी बिघडले आणि विमानाला पाऊस किंवा हिमवृष्टीचा सामना करावा लागला. त्यामुळे वैमानिकाने आणखी २ हजार फूट उंचीवर जाण्याची परवानगी मागितली. मात्र, त्याचवेळी विमान वेगाने खाली कोसळू लागले. परिस्थिती गंभीर झाल्याने वैमानिकाने आपत्कालीन स्थिती जाहीर केली. त्याने रेडिओवर संदेश देताना सांगितले, ‘आम्ही ८ हजार फूट खाली जात आहोत. मेडे, मेडे! आम्ही दर मिनिटाला १० हजार फूट वेगाने खाली कोसळत आहोत.’यानंतर वैमानिकाने विमानाचा वेग अत्यंत वाढला असून ते आणखी वेगाने खाली येत असल्याची माहिती दिली. तो म्हणाला, ‘विमानाचा वेग मर्यादेपेक्षा अधिक झाला आहे. आम्ही दर मिनिटाला २० हजार फूट वेगाने खाली जात आहोत.’ त्यानंतर काही क्षणांतच त्याने, ‘आम्ही जमिनीवर आदळणार आहोत,’ असा अखेरचा संदेश दिला.
हवाई वाहतूक नियंत्रण कक्षातील संभाषणाचे ध्वनिमुद्रण आणि विमानाच्या उड्डाणाचा मागोवा घेणाऱ्या आकडेवारीनुसार, विमान ३५ हजार फूट उंचीवरून पूर्व दिशेने प्रवास करत होते. त्याचवेळी विमानाला हवेतील अस्थिरता, बर्फ साचणे आणि खराब हवामानाचा सामना करावा लागला. त्यानंतर विमान वेगाने खाली येऊ लागले. खाली कोसळण्याचा त्याचा वेग दर मिनिटाला ३० हजार फुटांपर्यंत पोहोचला होता.
फ्लोरिडाचे गव्हर्नर रॉन डीसँटिस यांनी सांगितले की, जमिनीवर असलेल्या नागरिकांच्या जखमी होण्याची किंवा मृत्यूची कोणतीही तातडीची माहिती मिळालेली नाही. घटनास्थळी पत्रकारांशी बोलताना डीसँटिस म्हणाले, ‘हा अत्यंत भीषण विमान अपघात होता. एखादे क्षेपणास्त्र आकाशातून खाली कोसळल्यासारखे दृश्य होते. विमानामुळे रस्त्याच्या कडेला मोठा खड्डा पडला.’सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाने जवळील मोबाईल होम निवासी वसाहतीमधील सुमारे ६०० नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याची प्रक्रिया सुरू केली होती. पुढील आदेश मिळेपर्यंत परिसरातील रस्ताही वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. एफएएच्या माहितीनुसार, हे विमान टेक्सासमधील ऑस्टिन-बर्गस्ट्रॉम आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण करून बहामासच्या दिशेने जात होते.
दरम्यान, विमानातील प्रवाशांची ओळख आणि अपघाताचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. राष्ट्रीय हवामान सेवेनुसार, या परिसरात मुसळधार पाऊस सुरू असतानाच ही दुर्घटना घडली. तसेच सोमवार दुपारपर्यंत या भागात पूरस्थितीचा इशाराही लागू करण्यात आला होता.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode