राहुल गांधी कधीही देशाचे पंतप्रधान होणार नाहीत - अमित शाह
चंदीगडमध्ये २५० कोटींच्या नऊ प्रकल्पांचे भूमिपूजन आणि उद्घाटन चंदीगड, 01 नोव्हेंबर (हिं.स.)। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधताना म्हटले की, सोनिया गांधी यांचे स्वप्न आहे की त्यांचा मुलगा
WB AMIT SHAH BJP


चंदीगडमध्ये २५० कोटींच्या नऊ प्रकल्पांचे भूमिपूजन आणि उद्घाटन

चंदीगड, 01 नोव्हेंबर (हिं.स.)। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधताना म्हटले की, सोनिया गांधी यांचे स्वप्न आहे की त्यांचा मुलगा पंतप्रधान व्हावा; मात्र हे स्वप्न पूर्ण होत नाही. आता त्यांनी मॉक पार्लमेंट म्हणजेच संसदेचे प्रतिरूप तयार करून त्याचे कामकाज चालवण्याचा नवा मार्ग शोधला आहे. शाह म्हणाले की, मला राहुल गांधी यांना सांगायचे आहे की, जर तुम्हाला पंतप्रधान व्हायचे असेल, तर संपूर्ण आयुष्य मॉक पार्लमेंटमध्येच घालवा. तुमचा नंबर कधीच लागणार नाही. गेल्या तीन निवडणुकांपासून ते पराभूत होत आहेत.

अमित शाह रविवारी चंदीगडमधील सेक्टर-१७ येथील तिरंगा पार्कमध्ये २५० कोटी रुपयांच्या नऊ प्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमिपूजन केल्यानंतर आयोजित सभेला संबोधित करत होते. ते म्हणाले की, खोटे बोलणे, अराजकता पसरवणे, संसद चालू न देणे आणि संसदेतील मुद्दे रस्त्यावर आणून गोंधळ घालणे, हीच जर तुमची कार्यपद्धती असेल, तर येणारी पाच वर्षेही विरोधी पक्षात बसण्याची तयारी ठेवा.

गृहमंत्री म्हणाले की, काँग्रेस पक्षाला नरसंहाराच्या काळ्या दिवसानिमित्त मोठा कार्यक्रम आयोजित करण्याची इच्छा असेल, तर राहुल गांधी, तुमच्या मोहब्बत की दुकानमधून द्वेषाशिवाय दुसरे काहीही घेऊन कोणीही जाणार नाही. लोक केवळ द्वेष घेऊन जातील.

ते म्हणाले की, यानंतरही कार्यक्रम आयोजित करण्याचा हट्ट धरण्यात आला आणि परदेशातून आदेश देण्यात आला की, हजारो शीख नागरिकांना जिवंत जाळण्यात आले होते, त्याच दिवशी हा कार्यक्रम आयोजित केला जाईल. गुरूंच्या या पवित्र भूमीवरून मी या प्रयत्नाचा निषेध करतो. भारत आणि पंजाब हे कधीही विसरू शकणार नाहीत.

गृहमंत्री म्हणाले की, आम्हाला वाटले होते की, त्या वेळी राहुल गांधी यांचे वय कमी असेल आणि कदाचित त्यांनी इतिहासाचा अभ्यास केला नसेल. त्यामुळे त्यांना या घटनेची माहिती नसेल. आमच्या पक्षाने पत्रकार परिषद घेऊन आवाहन केले होते की, १, २ किंवा ३ नोव्हेंबर रोजी कार्यक्रम आयोजित करू नये, कारण हे १९८४ मधील शीखविरोधी दंगलीचे दिवस आहेत. यामुळे शीख कुटुंबांतील माता, भगिनी आणि मुलांच्या भावना दुखावल्या जातील.

शाह म्हणाले की, मला विश्वास आहे की, पंजाबच्या जवळ असूनही चंदीगड हे देशातील सर्वप्रथम अमली पदार्थमुक्त होणारे शहर बनेल. एनडीपीएस कायद्यांतर्गत नवीन कायदे लागू झाल्यानंतर चंदीगड पोलिसांनी ९३ टक्के आरोपींना तुरुंगात पाठवले आहे.

केंद्रीय गृहमंत्री म्हणाले की, पंजाबमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. तेथे राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार स्थापन करायचे आहे. अशा प्रकारची भाषा चालणार नाही. यानंतर त्यांनी उपस्थितांना दोन्ही हात वर करून घोषणा देण्याचे आवाहन केले. गृहमंत्री म्हणाले की, पंजाबमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या विजयाचे बीज पेरून जात आहोत.

चंदीगडचे प्रशासक आणि पंजाबचे राज्यपाल गुलाबचंद कटारिया म्हणाले की, आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आणि गौरवशाली आहे. देशाचे गृहमंत्री आणि सहकारमंत्री यांच्या उपस्थितीमुळे हा प्रसंग अधिक विशेष झाला आहे. आज चंदीगड, पंजाब आणि हरियाणा यांचा स्थापना दिवस आहे. या निमित्ताने मी तिन्ही राज्यांतील जनतेला मनःपूर्वक शुभेच्छा देतो.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande