
मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांचे चौकशी आणि जखमींवर उपचार करण्याचे निर्देश
जयपूर, 02 नोव्हेंबर (हिं.स.)। राजस्थानमधील झुंझुनू जिल्ह्यातील उदयपूरवाटी परिसरातील छापोली गावात सोमवारी रस्त्याच्या बांधकामादरम्यान मोठा अपघात झाला. कदम कुंड मार्गावर काम करणारी खडी मिसळण्याची मशीन वरून जाणाऱ्या ११ हजार व्होल्टच्या उच्चदाबाच्या वीजवाहिनीच्या संपर्कात आली. मशीनमध्ये वीजप्रवाह उतरल्याने तेथे काम करणारे मजूर त्याच्या विळख्यात सापडले. या अपघातात आठ मजुरांचा मृत्यू झाला, तर अन्य पाच जण भाजले. मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी या अपघातात मजुरांचा अकाली मृत्यू झाल्याबद्दल दुःख व्यक्त केले.
उदयपूरवाटी पोलीस ठाण्याचे प्रभारी रामपाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, रस्त्याच्या बांधकामादरम्यान खडी आणि गिट्टी मिसळण्याचे काम करणारी मशीन अचानक उच्चदाबाच्या वीजवाहिनीच्या संपर्कात आली. त्यानंतर मशीनमध्ये वीजप्रवाह उतरला आणि परिसरात काम करणारे मजूर त्याच्या संपर्कात आले. अपघातानंतर घटनास्थळी गोंधळ उडाला. पाच मजुरांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर अन्य तीन मजुरांनी रुग्णालयात उपचारादरम्यान प्राण सोडले.
या अपघातात आठ मजुरांचा मृत्यू झाल्यानंतर ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली. मोठ्या संख्येने लोक घटनास्थळी जमा झाले आणि त्यांनी धरणे आंदोलन सुरू केले.
मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी या अपघातात मजुरांचा अकाली मृत्यू झाल्याबद्दल दुःख व्यक्त केले. त्यांनी समाजमाध्यमावरील ‘एक्स’ या मंचावर म्हटले की, संबंधित अधिकाऱ्यांना जखमींवर योग्य उपचार करण्याचे, बाधित कुटुंबांना तातडीने शक्य ती सर्व मदत उपलब्ध करून देण्याचे आणि घटनेची चौकशी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दिवंगत आत्म्यांना शांती लाभावी, जखमी लवकर बरे व्हावेत आणि दुःखात असलेल्या कुटुंबीयांना या संकटाचा सामना करण्याचे बळ मिळावे, अशी प्रार्थनाही मुख्यमंत्र्यांनी केली.
राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनीही या अपघाताबद्दल दुःख व्यक्त केले. त्यांनी ‘एक्स’वर लिहिले की, उदयपूरवाटी येथील छापोली गावात विजेचा धक्का लागून मजुरांचा झालेला मृत्यू अत्यंत दुःखद आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. रस्त्याच्या बांधकामादरम्यान हा अपघात कसा घडला आणि या मृत्यूंसाठी कोण जबाबदार आहे, हे तपासातून स्पष्ट झाले पाहिजे, असेही त्यांनी म्हटले.
गेहलोत यांनी राज्य सरकारकडे मृत मजुरांच्या कुटुंबीयांना योग्य नुकसानभरपाई आणि शक्य ती सर्व मदत देण्याची मागणी केली. अपघातात जीव गमावलेल्या मजुरांच्या कुटुंबीयांप्रति त्यांनी संवेदना व्यक्त केल्या आणि दिवंगत आत्म्यांना शांती लाभावी, अशी प्रार्थना केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule