
मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दोन लाखांची मदत
नवी दिल्ली, 02 नोव्हेंबर (हिं.स.)। राजस्थानमधील झुंझुनू जिल्ह्यात रस्त्याच्या बांधकामादरम्यान विजेचा धक्का लागून आठ कामगारांचा मृत्यू झाल्याच्या घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. या दुर्घटनेत जखमी झालेल्या व्यक्ती लवकरात लवकर बऱ्या व्हाव्यात, अशी प्रार्थना करत त्यांनी मृतांच्या कुटुंबीयांसह जखमींसाठी आर्थिक मदतीची घोषणा केली आहे.
पंतप्रधान कार्यालयाने सोमवारी समाजमाध्यम मंच एक्सवर पंतप्रधानांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, झुंझुनूमध्ये झालेल्या दुर्घटनेत लोकांचा मृत्यू झाल्याने आपण अत्यंत दुःखी आहोत, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे. शोकाकुल कुटुंबीयांच्या दुःखात आपण सहभागी असून, जखमी व्यक्ती लवकर बऱ्या व्हाव्यात, अशी कामना त्यांनी व्यक्त केली.पंतप्रधानांनी पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या निकटवर्तीयांना दोन लाख रुपयांची सानुग्रह मदत देण्याची घोषणा केली आहे. तसेच दुर्घटनेत जखमी झालेल्या प्रत्येक व्यक्तीला ५० हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे.
उल्लेखनीय म्हणजे, झुंझुनू जिल्ह्यातील छापोली गावात रस्त्याच्या बांधकामादरम्यान ही दुर्घटना घडली. खडी आणि वाळू मिसळणारे यंत्र ११ हजार व्होल्ट क्षमतेच्या उच्चदाबाच्या वीजवाहिनीच्या संपर्कात आल्याने हा अपघात झाला. या दुर्घटनेत आठ कामगारांचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले. छापोली आणि कदमकुंड यांना जोडणाऱ्या लोकसहभागातून बांधण्यात येत असलेल्या रस्त्याचे काम सुरू असताना ही घटना घडली. मृत झालेले सर्व कामगार स्थानिक रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule