
मुंबई, 01 नोव्हेंबर (हिं.स.)भारताचा माजी कर्णधार रोहित शर्मासाठी येणारे दोन महिने खूप व्यस्त असणार आहेत. या महिन्यात तो न्यूझीलंडविरुद्ध पाच एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. त्यानंतर तो श्रीलंकेविरुद्ध तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळेल आणि मग देशांतर्गत क्रिकेटमध्ये पुनरागमन करेल. रोहित मुंबईकडून विजय हजारे ट्रॉफी खेळणार आहे. त्याने मुंबई क्रिकेट असोसिएशनला याबद्दल माहिती दिली आहे. या स्टार फलंदाजाने एमसीएला कळवले आहे की तो आगामी विजय हजारे ट्रॉफीमध्ये मुंबईकडून खेळण्यासाठी उपलब्ध आहे.
रोहितचे संपूर्ण लक्ष आता एकदिवसीय क्रिकेटवर केंद्रित झाले आहे. २०२४ मध्ये भारताला विश्वचषक जिंकून दिल्यानंतर त्याने टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आणि २०२५ मध्ये त्याने कसोटी क्रिकेटला अलिवदा केला होता. भारत पुढील वर्षी एकदिवसीय विश्वचषक खेळणार आहे. त्यामुळे, रोहित स्वतःला तंदुरुस्त आणि लयीत ठेवण्यासाठी कोणतीही कसर सोडत नाहीये. देशांतर्गत क्रिकेट खेळून त्याला स्वतःला सामन्यांसाठी सज्ज ठेवायचे आहे. १३ ते १९ डिसेंबर दरम्यान श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या भारताच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या घरच्या मालिकेनंतर रोहित संघात सामील होईल. हे सामने दिल्ली, बंगळूर आणि अहमदाबाद येथे खेळले जातील, ज्यातील पहिला सामना स्पर्धा सुरू होण्याच्या एक दिवस आधी होईल.
श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यांनंतर, २२ डिसेंबरपासून तीन टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांची मालिका खेळवली जाईल, ज्यात रोहित खेळणार नाही. यामुळे त्याच्याकडे विजय हजारे ट्रॉफीच्या साखळी टप्प्याचे शेवटचे दहा दिवस शिल्लक राहतील. भारताची झिम्बाब्वेविरुद्धची तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका ३ जानेवारीपासून सुरू होईल. साखळी सामने अहमदाबाद, बंगळूर, रांची आणि राजकोट येथे होणार असून, बाद फेरीचे सामने विशाखापट्टणम येथे होतील. झिम्बाब्वेविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांपैकी शेवटचा सामना ९ जानेवारी रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळला जाणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे