
टायगर श्रॉफप्रमाणे गोळ्या घालण्याची धमकी; पोस्टाने पाठवली पत्रे, सराफा बाजारात खळबळ
नागपूर, १ नोव्हेंबर (हिं.स.) : नागपुरातील आठ सराफा व्यापाऱ्यांना लॉरेन्स बिष्णोई गँगच्या नावाने खंडणीची धमकी देणारी पत्रे पोस्टाने पाठवण्यात आली आहेत. प्रत्येक व्यापाऱ्याकडे १० लाख रुपयांची मागणी करण्यात आली असून, पैसे न दिल्यास अभिनेता टायगर श्रॉफप्रमाणे गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या माध्यमातून एकूण ८० लाख रुपये उकळण्याचा प्रयत्न झाल्याचे समोर आले आहे. या प्रकारामुळे नागपुरातील सराफा बाजारात खळबळ उडाली आहे.
पत्रांमध्ये ‘१० लाख रुपये द्या, अन्यथा तुमचे तुकडे करू’, असा धमकीचा मजकूर लिहिण्यात आला आहे. व्यापाऱ्यांनी पैशांची जमवाजमव केल्यानंतर दुकानासमोर ‘जय श्रीराम’ असे लिहिण्यास सांगण्यात आले आहे. या खुणेवरून व्यापारी पैसे देण्यास तयार असल्याचा संकेत खंडणीखोरांना मिळणार होता. पत्रांमध्ये व्यापाऱ्यांना ‘मध्यमवर्गीय’ संबोधत शिवीगाळही करण्यात आली आहे.
प्राथमिक पाहणीत आठही पत्रांमधील हस्ताक्षर एकाच व्यक्तीचे असल्याचे दिसून आले आहे. पत्रांमध्ये लॉरेन्स बिष्णोईचे नाव वापरण्यात आले असले, तरी प्रत्यक्षात या गँगचा या प्रकारात सहभाग आहे का, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पत्रे कोणी पाठवली, ती कुठून पोस्ट करण्यात आली आणि धमकीमागे नेमके कोण आहे, याचा नागपूर पोलीस आणि गुन्हे शाखेकडून तपास सुरू आहे.
या घटनेनंतर सराफा असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेश रोकडे आणि सचिव अंशुल हरडे यांच्या नेतृत्वाखाली व्यापाऱ्यांनी पोलिसांकडे तक्रार केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्याकडे व्यापाऱ्यांनी कडक सुरक्षा व्यवस्था करण्याची मागणी केली आहे.
बिष्णोई गँगच्या नावाचा वापर करून दहशत
एकाच पद्धतीने आठ व्यापाऱ्यांना पत्रे पाठवणे आणि पैसे देण्याची तयारी दर्शवण्यासाठी विशिष्ट खूण सांगणे, हे तपासाच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरत आहे. संबंधित व्यापाऱ्यांची माहिती खंडणीखोरांपर्यंत कशी पोहोचली, सर्व पत्रांचा परस्परांशी काय संबंध आहे आणि बिष्णोई गँगच्या नावाचा वापर नेमका कोणी केला, याचा शोध पोलीस घेत आहेत. गँगच्या नावाचा वापर करून दहशत निर्माण करणे आणि त्यातून खंडणी उकळणे, हा या प्रकरणातील तपासाचा महत्त्वाचा मुद्दा आहे.
यापूर्वीही खंडणीच्या धमक्या
नागपुरात यापूर्वीही बिष्णोई गँगच्या नावाने खंडणी मागण्याचे प्रकार घडले आहेत. २०२४ मध्ये अनंतनगर येथील रेणुका ज्वेलर्सचे संचालक मोहन विश्वनाथ डोमडे यांना निनावी फोन करून दोन कोटी रुपये ‘प्रोटेक्शन मनी’ म्हणून देण्याची मागणी करण्यात आली होती. पैसे न दिल्यास व्यापारी आणि त्यांच्या कुटुंबीयांना ठार मारण्याची, तसेच कुटुंबाकडून १० कोटी रुपये वसूल करण्याची धमकी देण्यात आली होती. या प्रकरणी गिट्टीखदान पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.
त्यानंतर १९ ऑगस्ट २०२६ रोजी सर्व्हे नगरातील एका ६० वर्षीय व्यक्तीला आणि कॅनडात नोकरी करणाऱ्या त्यांच्या मुलीला बिष्णोई गँगच्या नावाने ई-मेल पाठवण्यात आले होते. त्यामध्ये १० लाख रुपयांची मागणी करत जीवे मारण्याची तसेच मुलीचे फोटो सोशल मीडियावर प्रसारित करण्याची धमकी देण्यात आली होती.
आता आठ सराफा व्यापाऱ्यांना एकाच वेळी आलेल्या धमकीच्या पत्रांमुळे शहरातील व्यापाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी