
वॉशिंग्टन, 01 नोव्हेंबर (हिं.स.)।अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेला संघर्ष दिवसेंदिवस अधिक भीषण होत चालला आहे. अशा परिस्थितीत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा इराण विरोधातील आपली भूमिका स्पष्ट केली आहे.ट्रम्प यांनी इराणला थेट इशारा देताना म्हटले की, अमेरिकेला इराणमधील आणखी एक किंवा दोन ठिकाणे उद्ध्वस्त करायची आहेत. हे काम अमेरिका अवघ्या १० मिनिटांत पूर्ण करू शकते. इराणचे नवे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांनी अमेरिका आणि इस्रायलला नव्या हल्ल्यांचा उघड इशारा दिला असतानाच ट्रम्प यांचे हे विधान समोर आले आहे.
फ्लोरिडामध्ये पत्रकारांशी बोलताना राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले की, अमेरिकेने इराणच्या अणुकार्यक्रमाला यापूर्वीच मोठा धक्का दिला आहे. मात्र, पिकॅक्स माउंटनसारखी काही ठिकाणे अद्याप पूर्णपणे उद्ध्वस्त करणे बाकी आहे.या आठवड्यातच अमेरिका इराणवर लष्करी हल्ला करू शकते का, असा प्रश्न ट्रम्प यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी अत्यंत तिखट शब्दांत उत्तर दिले. ते म्हणाले, तुम्ही असा मूर्खपणाचा प्रश्न का विचारत आहात? समजा, मी हल्ला करणार असलो, तरी त्याबद्दल तुम्हाला आधीच सांगणार आहे का? दरम्यान, इराणसोबतची चर्चा समाधानकारक सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र, इराणवर फारसा विश्वास ठेवता येत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दुसरीकडे, इराणचे नवे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांनी प्रथमच वरिष्ठ लष्करी कमांडरांसोबत बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी कमांडरांना कठोर निर्देश दिले की, अमेरिका आणि इस्रायलच्या शत्रूशी संबंधित प्रत्येक लहान-मोठ्या मालमत्तेचा इराणच्या नव्या लक्ष्य यादीत समावेश करण्यात यावा. कोणत्याही प्रकारच्या धमकीला तातडीने, प्रभावीपणे आणि कोणत्याही भौगोलिक मर्यादेशिवाय प्रत्युत्तर दिले जाईल, असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला. विशेष म्हणजे, अमेरिकी माध्यमांमधील वृत्तांकन आणि स्वतः ट्रम्प यांनी यापूर्वी केलेल्या विधानांवरून असे संकेत मिळत आहेत की, अमेरिकेच्या मध्यावधी निवडणुकांनंतर इराणविरोधात पुन्हा एकदा मोठी लष्करी मोहीम सुरू केली जाऊ शकते.
वृत्तानुसार, वॉशिंग्टनने आखाती प्रदेशातील अनेक अरब देशांना इशारा दिला आहे की, ३ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या अमेरिकी निवडणुकांनंतर इराणविरोधात मर्यादित आणि तीव्र लष्करी कारवाईसाठी त्यांनी तयार राहावे.दुसरीकडे, अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांनीही शनिवारी इशारा दिला. अमेरिका कधीही आपली लष्करी उद्दिष्टे साध्य करू शकते, असे त्यांनी म्हटले. मात्र, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नव्या हल्ल्यांबाबत अद्याप कोणताही अंतिम निर्णय घेतलेला नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. याशिवाय, इराण व्यावसायिक जहाजांना लक्ष्य करत असल्याचा गंभीर आरोपही रुबिओ यांनी केला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode