
नवी दिल्ली, 10 नोव्हेंबर, (हिं.स.)। आंतरराष्ट्रीय ऊर्जा बाजारात भूराजकीय तणाव कमी होण्याची शक्यता निर्माण झाल्याने कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये घसरण सुरूच आहे. सोमवारी कच्च्या तेलाचे भाव तीन महिन्यांच्या नीचांकी पातळीवर घसरले होते. त्यानंतर आजही कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये नरमाईचा कल कायम आहे. या मोठ्या घसरणीचे मुख्य कारण म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेले ताजे विधान मानले जात आहे. या विधानात त्यांनी इराणवर आता आणखी नव्याने हल्ले करण्याची गरज नसल्याचे संकेत दिले आहेत.
या घसरणीनंतर ब्रेंट क्रूडची किंमत आता प्रति बॅरल ९० डॉलरच्या मानसिक पातळीच्याही खाली आली आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी एकच्या सुमारास ब्रेंट क्रूडचा भाव मागील बंद भाव ९२.५७ डॉलरच्या तुलनेत ३.३९ डॉलर म्हणजेच ३.६६ टक्क्यांनी घसरून प्रति बॅरल ८९.१८ डॉलरपर्यंत खाली आला होता. मात्र, त्यानंतर त्याच्या किमतीत किंचित सुधारणा झाली. सध्या सायंकाळी ४.१५ वाजता ब्रेंट क्रूड २.६९ डॉलर म्हणजेच २.९१ टक्क्यांच्या घसरणीसह प्रति बॅरल ८९.८८ डॉलरवर व्यवहार करत आहे.
त्याचप्रमाणे अमेरिकन क्रूड म्हणजेच वेस्ट टेक्सास इंटरमिजिएट (डब्ल्यूटीआय)च्या किमतीतही मोठी घसरण दिसून येत आहे. डब्ल्यूटीआय क्रूड आज मागील बंद भाव ८६.८५ डॉलरच्या तुलनेत २.९७ डॉलर म्हणजेच ३.४२ टक्क्यांनी घसरून प्रति बॅरल ८३.८८ डॉलरपर्यंत पोहोचले. मात्र, त्यानंतर त्याच्या किमतीत काहीशी वाढ झाली. त्यामुळे सायंकाळी ४.१५ वाजता डब्ल्यूटीआय क्रूड १.९५ डॉलर म्हणजेच २.२५ टक्क्यांच्या घसरणीसह प्रति बॅरल ८४.९० डॉलरवर व्यवहार करत होते.
कच्च्या तेलाच्या या संपूर्ण घडामोडीवर नजर टाकल्यास ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस ब्रेंट क्रूडच्या किमती सहा महिन्यांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचल्या होत्या. मात्र, तेव्हापासून आतापर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारात त्यांच्या किमतींमध्ये सातत्याने घसरण होत आहे. किमतींमधील या अलीकडील नरमाईमागे अमेरिकेत झालेल्या मध्यावधी निवडणुकांचे निकाल आणि त्यानंतर इराणसोबतच्या युद्धाबाबत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भूमिकेत झालेला बदल ही प्रमुख कारणे मानली जात आहेत. ट्रम्प यांच्या भूमिकेतील बदलामुळे इराणसोबतचा संघर्ष लवकर संपण्याच्या शक्यता मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत.
बाजारतज्ज्ञांच्या मते, निवडणुकीच्या निकालांमुळे इराणविरोधात मोठी लष्करी मोहीम राबवण्याचे ट्रम्प यांचे पर्याय बऱ्याच प्रमाणात मर्यादित झाले आहेत. त्यामुळे तेलाच्या किमतींमध्ये समाविष्ट असलेला भूराजकीय जोखमीचा अतिरिक्त प्रीमियम आता हळूहळू कमी होत आहे. मात्र, तेहरानसोबत कोणताही ठोस करार न झाल्यास ब्रेंट क्रूडची किंमत प्रति बॅरल ८५ डॉलरच्या वरच टिकून राहू शकते, असेही तज्ज्ञांचे मत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule