

- जगातील श्रीमंतांच्या यादीत हुआंग दहाव्या क्रमांकावर
नवी दिल्ली, 10 नोव्हेंबर (हिं.स.)। कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) क्षेत्रासाठी चिप्स तयार करणाऱ्या एनव्हिडिया कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) जेन्सन हुआंग सध्या त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे आणि चिनी हेरगिरी प्रकरणामुळे चर्चेत आहेत. एका चिनी महिलेसोबत प्रेमसंबंध असल्याच्या बातम्यांनंतर हुआंग यांची फोर्ब्सच्या श्रीमंतांच्या यादीत एका स्थानाने घसरण होऊन ते दहाव्या क्रमांकावर पोहोचले आहेत.
फोर्ब्सने प्रसिद्ध केलेल्या यादीनुसार, ९ नोव्हेंबर रोजी अमेरिकी शेअर बाजारातील व्यवहार सुरू झाल्यानंतर पहिल्या अर्ध्या तासातच हुआंग यांची एकूण संपत्ती १५४.७ अब्ज डॉलरवर आली. चिनी महिलेसोबत प्रेमसंबंध असल्याच्या बातम्यांमुळे जेन्सन हुआंग यांची फोर्ब्सच्या यादीत एका स्थानाने घसरण झाली आहे.
फोर्ब्सच्या ताज्या यादीनुसार, त्यांची संपत्ती ६.८० अब्ज डॉलरने घटून १५५.४ अब्ज डॉलर झाली आहे. भारतीय चलनानुसार, त्यांच्या संपत्तीत सुमारे ६३ हजार कोटी रुपयांची घट झाली असून ती १४.३२ लाख कोटी रुपयांवर आली आहे. यामुळे जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्तींच्या यादीत ते आठव्या स्थानावरून दहाव्या स्थानावर घसरले आहेत. आता वॉरेन बफे आणि ओरॅकलचे सहसंस्थापक लॅरी एलिसन यांनीही त्यांना मागे टाकले आहे. यापूर्वी ६ नोव्हेंबर रोजीही त्यांच्या संपत्तीत मोठी घसरण नोंदवण्यात आली होती.
एनव्हिडिया कंपनीच्या शेअर्समध्ये झालेल्या विक्रीमुळे जेन्सन हुआंग यांच्या संपत्तीत ही घसरण झाली आहे. कंपनीचा शेअर ७.९७ डॉलर म्हणजेच ४.२७ टक्क्यांनी घसरून १७८.६७ डॉलरवर बंद झाला. व्यवहारादरम्यान शेअरच्या किमतीत आठ टक्क्यांहून अधिक घसरण होऊन तो १७० डॉलरच्या आसपास पोहोचला होता. मात्र, नंतर त्यात काही प्रमाणात सुधारणा झाली.
सिंगापूरमधील व्यावसायिक एलिस हुआंग यांच्यासोबत कथित संबंध आणि हेरगिरीशी संबंधित आरोपांमुळे त्यांच्या संपत्तीत एका दिवसात ७.४ अब्ज डॉलर म्हणजेच सुमारे ७०० अब्ज रुपयांची घट झाली आहे. या आरोपांमुळे कंपनीच्या शेअर्सवर सातत्याने दबाव निर्माण होत आहे. फोर्ब्सच्या रिअल टाइम यादीनुसार, इलॉन मस्क हे जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यानंतर जेफ बेझोस आणि लॅरी पेज यांचा क्रमांक लागतो. या यादीत मार्क झुकरबर्ग, सर्गेई ब्रिन आणि मायकेल डेल यांचाही पहिल्या दहा श्रीमंत व्यक्तींमध्ये समावेश आहे.
उल्लेखनीय म्हणजे, जेन्सन हुआंग यांच्या संपत्तीचा मोठा हिस्सा एनव्हिडिया कंपनीतील त्यांच्या भागीदारीशी संबंधित आहे. हुआंग यांच्याकडे एनव्हिडियाचे ३.५ टक्क्यांहून अधिक शेअर्स असून ते कंपनीचे सर्वात मोठे वैयक्तिक भागधारक आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule