दक्षिण भारतातील अनेक भागांमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता
नवी दिल्ली, 10 नोव्हेंबर (हिं.स.)। देशाच्या विविध भागांतील हवामानात बदल होताना दिसत आहे. एका बाजूला उत्तर भारतात दिवसेंदिवस धुक्यासह थंडीचा कडाका वाढत आहे, तर दुसरीकडे दक्षिण भारतातील अनेक भागांत मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यांची शक्यता वर्तवण्यात आ
IMD MANSOON RAIN INDIA


नवी दिल्ली, 10 नोव्हेंबर (हिं.स.)। देशाच्या विविध भागांतील हवामानात बदल होताना दिसत आहे. एका बाजूला उत्तर भारतात दिवसेंदिवस धुक्यासह थंडीचा कडाका वाढत आहे, तर दुसरीकडे दक्षिण भारतातील अनेक भागांत मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यांची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

भारतीय हवामान विभागाच्या (आयएमडी) माहितीनुसार, १३ नोव्हेंबर रोजी दक्षिण-पूर्व बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे. पुढील २४ तासांत हे क्षेत्र अधिक तीव्र होऊन स्पष्ट कमी दाबाच्या क्षेत्रात रूपांतरित होऊ शकते.दिल्ली-एनसीआरमध्ये येत्या काही दिवसांत सकाळच्या वेळी हलक्या ते मध्यम स्वरूपाचे धुके पाहायला मिळेल. ११ ते १३ नोव्हेंबरदरम्यान आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. या काळात कमाल तापमान २७ ते ३० अंश सेल्सिअस, तर किमान तापमान १४ ते १७ अंश सेल्सिअसदरम्यान राहण्याचा अंदाज आहे.

हवामान विभागाच्या माहितीनुसार, मध्य आणि उच्च क्षोभमंडळात सक्रिय असलेल्या पश्चिमी विक्षोभाच्या प्रभावामुळे पर्वतीय भागांतील हवामानात बदल होण्याची शक्यता आहे. जम्मू-काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये १३ नोव्हेंबरपर्यंत पश्चिम हिमालयीन भागात काही ठिकाणी ते व्यापक स्वरूपात पाऊस आणि हिमवृष्टी होण्याची शक्यता आहे. विशेषतः १२ नोव्हेंबर रोजी काश्मीर खोऱ्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस आणि हिमवृष्टी होऊ शकते. १२ ते १६ नोव्हेंबरदरम्यान पंजाबच्या काही भागांत हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच ११ ते १४ नोव्हेंबरदरम्यान जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेशात ताशी ४० ते ६० किलोमीटर वेगाने जोरदार वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

दक्षिण भारतातील दक्षिण-पूर्व अरबी समुद्र, मन्नारचे आखात आणि लक्षद्वीप परिसरात निर्माण झालेल्या चक्रीय वाऱ्यांच्या स्थितीमुळे द्वीपकल्पीय भारतात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि कराईकलमध्ये ११, १५ आणि १६ नोव्हेंबर रोजी काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. केरळ आणि माहे येथे ११ ते १५ नोव्हेंबरदरम्यान पाऊस सुरू राहील, तर १६ नोव्हेंबर रोजी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. किनारी आंध्र प्रदेश, यानम, रायलसीमा तसेच कर्नाटकच्या किनारी आणि दक्षिण अंतर्गत भागांत १४ ते १६ नोव्हेंबरदरम्यान पाऊस पडण्याची शक्यता आहे.

अंदमान आणि निकोबार बेटांवर ११ ते १६ नोव्हेंबरदरम्यान अनेक ठिकाणी पाऊस पडू शकतो. याच काळात मुसळधार पावसासह ताशी ४० ते ६० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. ११ नोव्हेंबर रोजी बिहार, झारखंड, उप-हिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. ईशान्येकडील राज्यांमध्ये ११ आणि १२ नोव्हेंबरदरम्यान अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरा येथे तुरळक ठिकाणी पाऊस होऊ शकतो. दरम्यान, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरा या राज्यांसाठी मुसळधार पावसाचा इशारा जारी करण्यात आला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande