
रत्नागिरी, 11 नोव्हेंबर (हिं.स.) । संगमेश्वर तालुक्यातील नायरी (मूळ गाव फणसवणे) येथील ९१ वर्षीय वृद्ध महिला जुलेखा इसाक मोडक यांच्या मृत्यूप्रकरणी संगमेश्वर पोलिसांनी त्यांची सून नाशिरा अस्लम मोडक हिला अटक केली आहे.वृद्ध सासूला लाकडी दांडक्याने आणि हाताबुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप तिच्यावर असून, उपचारादरम्यान सासूचा मृत्यू झाल्याने या प्रकरणाला गंभीर वळण मिळाले होते.गेल्या काही दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या संशयित महिलेला बुधवारी पहाटेपासून शोधमोहीम राबवत पोलिसांनी ताब्यात घेतले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २९ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ४ ते ५.३० वाजण्याच्या दरम्यान नायरी येथील राहत्या घरी जुलेखा मोडक यांना मारहाण झाली होती. वृद्ध सासूची देखभाल करण्याची जबाबदारी आणि त्यांना बाहेर फिरायला जाता येत नसल्याच्या कारणावरून सून नाशिरा मोडक हिने त्यांना लाकडी दांडक्याने व हाताबुक्क्यांनी मारहाण केल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. या मारहाणीत जुलेखा यांच्या उजव्या गुडघ्याला, डाव्या पायाला आणि उजव्या मनगटाला दुखापत झाली होती.या घटनेची माहिती मिळताच जुलेखा मोडक यांची मुलगी जैबुनिसा निजामुद्दीन लांबे (वय ६०, रा. नेरूळ, नवी मुंबई) यांनी संगमेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार सुनेविरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.दरम्यान, जखमी जुलेखा मोडक यांच्यावर उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर आधीच दाखल असलेल्या गुन्ह्याचे गांभीर्य अधिक वाढले.
वृद्ध महिलेच्या मृत्यूनंतर संशयित सून नाशिरा मोडक पोलिसांच्या हाती लागत नव्हती. तिचा शोध घेत असताना नायरी येथील तिच्या घराच्या मुख्य दरवाजाला आतून कडी लावलेली, तर मागील बाजूला कुलूप असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यामुळे घरात कोणीतरी लपून बसल्याचा संशय बळावल्याने पोलिसांनी घरावर बारीक लक्ष केंद्रित केले.आज पहाटे पाच वाजल्यापासून संगमेश्वर पोलीस ठाण्याचे हेडकॉन्स्टेबल विनय मनवल यांनी संशयित महिलेचा शोध सुरू केला. त्यानंतर सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास हेडकॉन्स्टेबल क्रांती सावंत आणि पोलीस हवालदार भोसले यांच्या पथकाने नाशिरा मोडकला ताब्यात घेतले. या प्रकरणाचे पुढील तपासकार्य जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मितेश किणी करीत असून, शवविच्छेदन अहवालानंतर जुलेखा मोडक यांच्या मृत्यूचे नेमके कारण आणि पुढील कायदेशीर कारवाईची दिशा स्पष्ट होणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी