
ठाणे, 11 नोव्हेंबर (हिं.स.)। कळव्याच्या जयभीम नगर -2 येथील त्रिरत्न बुद्धविहाराचे कुलूप तोडून गौतम बुद्ध आणि डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्ती अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्या आहेत. या प्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जयभीम नगर 2 येथे त्रिरत्न सेवाभावी संस्थेच्या वतीने त्रिरत्न बुद्धविहार संचालित करण्यात येत आहे. सन 2019-20 मध्ये या विहाराचे लोकार्पण डाॅ.जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते करण्यात आले होते. परिसरातील बौद्ध बांधव या विहारात नियमित बुद्धवंदनेसाठी एकत्र येत असतात. मंगळवारी रात्री वंदना झाल्यानंतर हे विहार कुलूप लावून बंद करण्यात आले. त्यानंतर आज पहाटे येथील नागरिक बुद्धविहाराजवळ गेले असता, दरवाजाचे कुलूप तुटलेले दिसले. नागरिकांनी विहारात जाऊन पाहिले असता, आत असलेल्या पितळी धातूच्या गौतम बुद्ध आणि डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्ती चोरट्यांनी लंपास केल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणी स्थानिक नागरिकांनी दिलेल्या तक्रारीवरून कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, या भागात गावगुंडांनी उच्छाद मांडला आहे. अंमली पदार्थांचा व्यापारही या परिसरात होत आहे. गर्दुल्यांचा वावर वाढला आहे. त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पोलिसांनी गस्त वाढवावी, अशी मागणी आम्ही करीत आहोत. मात्र, त्या मागणीची पूर्तता न झाल्याने ही चोरी झाली आहे. संतप्त झालेल्या आंबेडकरी जनतेला शांत करण्यात तूर्तास आम्हाला यश आले आहे. मात्र, लवकरात लवकर या चोरट्यांना जेरबंद न केल्यास येथील जनता तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा येथील सामाजिक कार्यकर्ते तुळशीराम साळवे यांनी दिला.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर