
पुणे, ११ नोव्हेंबर (हिं.स.) : खेड तालुक्यातील तिन्हेवाडी येथे किरकोळ वादातून एका २६ वर्षीय तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली आहे. काही दिवसांपूर्वी दुचाकीला कट मारल्याच्या कारणावरून झालेल्या वादाचा राग मनात धरून तीन अल्पवयीन मुलांनी हा हल्ला केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात शिवम बाळासाहेब करमारे हा तरुण गंभीर जखमी झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिवम याच्या डोक्यावर आणि हातावर कोयत्याने वार करण्यात आले. हल्ल्यानंतर त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
जखमी शिवमचा चुलत भाऊ आदित्य काळूराम करमारे याने दिलेल्या तक्रारीनुसार, तिन्हेवाडी येथे दुपारी पावणेतीनच्या सुमारास ही घटना घडली. शिवम दुचाकीवरून जात असताना तिन्ही अल्पवयीन मुलांनी त्याला भररस्त्यात अडवले. त्यानंतर अचानक त्याच्यावर कोयत्याने हल्ला चढवत डोक्यावर आणि हातावर वार केले.
काही दिवसांपूर्वी झालेल्या वाहनाला कट मारण्याच्या वादातून हा हल्ला झाल्याची माहिती तक्रारीतून समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पुढील पोलीस तपासाबाबत अधिक माहिती मिळणे बाकी आहे.
--------------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु