
सोलापूर, ११ नोव्हेंबर (हिं.स.) : मामांची बदनामी करणारी बातमी वृत्तपत्रात प्रसिद्ध करण्याची धमकी देत तसेच मावस भावाविरुद्धची तक्रार मिटविण्यासाठी ५० लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार महावीर चौकात उघडकीस आला आहे. याप्रकरणी सदर बझार पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत श्रीकांत मेलगेपाटील (रा. लिमयेवाडी) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार ऋषिकेश मनलोर (वय ३५) आणि राजबक्ष गुंडापुरे (दोघेही रा. सोलापूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीनुसार, श्रीकांत मेलगेपाटील हे महावीर चौकात मित्रासोबत गप्पा मारत बसले होते. त्यावेळी संशयित आरोपींनी त्यांना फोन केला. फिर्यादींचे मामा दिलीप माने यांच्याबाबत वृत्तपत्रात खोटी बातमी प्रसिद्ध करून त्यांची बदनामी करण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे.
तसेच फिर्यादींचे मावसभाऊ निखिल भोसले यांच्याविरुद्ध दाखल झालेली तक्रार मिटविण्यासाठी संशयितांनी ५० लाख रुपयांची मागणी केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. पैसे देण्यास नकार दिल्यानंतर शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणी सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहायक पोलीस निरीक्षक पाटील पुढील तपास करीत आहेत.
------------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड