मनमाड रेल्वे स्थानक परिसरात खंडणीसाठी पार्किंग चालकावर प्राणघातक हल्ला
Deadly attack on parking driver over parking fee dispute near Manmad railway station;
Deadly attack on parking driver


मनमाड, १२ नोव्हेंबर (हिं.स.) : मनमाड रेल्वे स्थानक परिसरातील सहा क्रमांकाच्या फलाटासमोरील पार्किंग चालकावर हप्ता वसुली आणि खंडणीच्या कारणावरून चार जणांनी प्राणघातक हल्ला केल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. या हल्ल्यात पार्किंग चालक सुरेश उर्फ बिट्टू कसबे (वय ३६, रा. शांतिनगर, मनमाड) गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्या पोटावर आणि पाठीवर धारदार शस्त्राने वार करण्यात आले. या प्रकरणी मनमाड शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील एका आरोपीला अटक करण्यात आली असून, नगरसेवक विशाल अहिरे यांच्यासह तिघे आरोपी फरार असल्याची माहिती आहे.

पोलिसांत दाखल फिर्यादीनुसार, सुरेश कसबे हे कुटुंबीयांसह मनमाड रेल्वे स्थानकाच्या सहा क्रमांकाच्या फलाटासमोरील पे अँड पार्क पार्किंगचा व्यवसाय सांभाळतात. ८ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री दोन ते अडीच वाजण्याच्या सुमारास ते पार्किंग परिसरात असताना विशाल राजेंद्र अहिरे (रा. रमाबाई नगर, मनमाड) तेथे आला. त्याने पार्किंग व्यवसायाच्या हप्त्यापोटी २५ हजार रुपयांची मागणी केली. मात्र, कसबे यांनी पैसे देण्यास विरोध केल्याने अहिरे याने त्यांना शिवीगाळ करून दमदाटी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

काही वेळानंतर विशाल अहिरे याच्यासोबत अमन ठाकूर, आदित्य गणेश घोडेराव आणि रोहित गरुड (सर्व रा. रमाबाई नगर, मनमाड) हे पुन्हा पार्किंग परिसरात आले. त्यांनी सुरेश कसबे यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी अमन ठाकूर याने जीवे मारण्याच्या उद्देशाने कसबे यांच्या पोटावर आणि पाठीवर धारदार शस्त्राने वार केल्याचा आरोप आहे. इतर आरोपींनीही लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या कसबे यांना त्यांचे मामा गौतम वाघ आणि मावसभाऊ किशोर जाधव यांनी तातडीने मनमाड येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नाशिक येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले.

या घटनेप्रकरणी सुरेश कसबे यांच्या फिर्यादीवरून विशाल राजेंद्र अहिरे, अमन ठाकूर, आदित्य गणेश घोडेराव आणि रोहित गरुड यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १०९(१), ३०८(३), ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२), ३५१(३) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील एका आरोपीला अटक करण्यात आली असून, उर्वरित तिघांचा शोध सुरू असल्याची माहिती आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक भारत बाळकृष्ण जाधव करीत आहेत.

दरम्यान, रेल्वे स्थानक परिसरात हप्ता वसुली आणि मारहाणीच्या अशा घटनांमुळे व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सार्वजनिक ठिकाणी व्यवसाय करणाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, पोलिसांनी अशा घटनांना आळा घालण्यासाठी कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

-------------------------

हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI


 rajesh pande