
ऑकलंड (न्यूझीलंड), 12 नोव्हेंबर (हिं.स.)ऑकलंडमध्ये झालेल्या 'फोर्ड ट्रॉफी'च्या सामन्यात, ऑकलंड एसेसकडून खेळणाऱ्या न्यूझीलंडच्या बेव्हॉन जेकब्सने १३७ चेंडूंत २०२ धावांची धडाकेबाज खेळी केली. भारताविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत प्रभावी कामगिरी केल्यानंतर, बेव्हॉनने या सामन्यात १३७ चेंडूंत २०२ धावा केल्या. त्याच्या या खेळीत ७ चौकार आणि तब्बल २१ षटकारांचा समावेश होता. आणि त्याचा स्ट्राईक रेट १४७.४४ इतका होता.
एका 'लिस्ट-ए' डावात २१ षटकार मारणारा तो दुसरा फलंदाज ठरला आहे. या विक्रमात अव्वल स्थानी ऑस्ट्रेलियन फलंदाज डार्सी शॉर्ट आहे. त्याने २०१८ मध्ये वेस्टर्न ऑस्ट्रेलियाकडून खेळताना क्वीन्सलँडविरुद्ध १४८ चेंडूंत २५७ धावा केल्या होत्या. त्या खेळीत त्याने २३ षटकार आणि १५ चौकार लगावले होते.
'लिस्ट-ए' पुरुष क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणारा तो चौथा न्यूझीलंडचा फलंदाज ठरला आहे. त्याच्या आधी मार्टिन गप्टिल (१६३ चेंडूंत नाबाद २३७), जेमी हाऊ (१३८ चेंडूंत २२२) आणि चॅड बोव्स (११० चेंडूंत २०५) यांनी ही कामगिरी केली होती. 'फोर्ड ट्रॉफी'च्या इतिहासातील हे तिसरे द्विशतक आहे.
'फोर्ड ट्रॉफी'मधील आपल्या कारकिर्दीत, बेव्हॉनने ३१ सामन्यांच्या २७ डावांत ३९.५४ च्या सरासरीने आणि १०८.७५ च्या स्ट्राईक रेटने ८७० धावा केल्या आहेत; ज्यात एक शतक आणि चार अर्धशतकांचा समावेश आहे. 'लिस्ट ए' क्रिकेटमध्ये त्याने ३३ सामन्यांच्या २९ डावांत ३६.२५ च्या सरासरीने आणि १०७.८० च्या स्ट्राईक रेटने ८७० धावा केल्या आहेत, ज्यामध्ये एक शतक आणि चार अर्धशतके आहेत.
२०२५ मध्ये पदार्पण केल्यापासून, बेव्हॉनने न्यूझीलंडसाठी १६ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्याने १४ डावांत ३१.९० च्या सरासरीने आणि १४४.३४ च्या स्ट्राईक रेटने ३१९ धावा केल्या आहेत. यात दोन अर्धशतकांचा समावेश असून, त्याची सर्वोत्तम धावसंख्या नाबाद ६२ अशी आहे. भारताच्या विरोधात नुकत्याच झालेल्या टी-२० मालिकेत, त्याने पाच डावांत ४५.३३ च्या सरासरीने आणि १४६.२३ च्या स्ट्राईक रेटने एकूण १३६ धावा केल्या होत्या यात एका अर्धशतकाचा समावेश होता.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे