
वॉशिंग्टन, 13 नोव्हेंबर (हिं.स.)।अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांनी एका सैनिकाला लष्करी पदक देऊन सन्मानित केले आहे. या सैनिकाने अज्ञात सैनिकाच्या समाधीस्थळी शांतता आणि शिस्त राखण्यात अपयशी ठरल्याबद्दल हेगसेथ आणि त्यांच्या सहकाऱ्यांना सुनावले होते. अमेरिकेतील आर्लिंग्टन राष्ट्रीय स्मशानभूमीला भेट दिली असताना, ‘व्हेटरन्स डे’च्या दिवशी ही घटना घडली होती.
पेंटागॉनच्या माहितीनुसार, गुरुवारी हेगसेथ यांनी या स्मारकाच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या लष्कराच्या तुकडीतील सदस्यांचे पेंटागॉनमध्ये स्वागत केले. यावेळी त्यांनी स्पेशालिस्ट थॉमस इग्लेसियस यांना ‘जॉइंट सर्व्हिस कमेंडेशन मेडल’ प्रदान करून सन्मानित केले. ११ नोव्हेंबर २०२६ रोजी अज्ञात सैनिकाच्या समाधीस्थळी आपले कर्तव्य बजावल्याबद्दल त्यांना हा सन्मान देण्यात आला.
हेगसेथ यांनी या सन्मान सोहळ्याची काही छायाचित्रे समाजमाध्यमांवरही शेअर केली आहेत. यातील एका छायाचित्रात ते इग्लेसियस यांच्या गणवेशावर पदक लावताना दिसत आहेत. हेगसेथ यांनी पोस्टमध्ये लिहिले, “आम्ही सैनिकांवर प्रेम करतो. आम्ही नियम आणि शिस्तीला महत्त्व देतो. अतिशय उत्तम कामगिरी, स्पेशालिस्ट!”
बुधवारी समोर आलेल्या एका व्हिडिओमुळे इग्लेसियस चर्चेत आले होते. ‘व्हेटरन्स डे’च्या कार्यक्रमानंतर स्मारकस्थळी त्यांनी हेगसेथ, त्यांची पत्नी जेनिफर आणि त्यांच्या अनेक वरिष्ठ सहकाऱ्यांना सुनावल्याचे या व्हिडिओत दिसत होते. या कार्यक्रमाला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स हे देखील उपस्थित होते.
या कार्यक्रमानंतर संबंधित समूहाने स्मारकासमोरील रिकाम्या पायऱ्यांवर छायाचित्रे काढली होती. यावेळी त्यांच्यातील संभाषण आणि हसण्याचे आवाज येत होते. त्यामुळे इग्लेसियस यांनी त्यांना सूचना देत म्हटले, “सर्व अभ्यागतांना विनंती आहे की, त्यांनी नेहमी शांतता राखावी आणि आदरयुक्त वर्तन करावे.”
हा व्हिडिओ समोर आल्यानंतर पेंटागॉनचे प्रवक्ते शॉन पार्नेल यांनी सैनिकाच्या कृतीचे समर्थन केले. इग्लेसियस यांनी सर्वांना योग्य पद्धतीने आणि आदरपूर्वक शांतता व शिस्त राखण्याची आठवण करून दिली होती, असे त्यांनी स्पष्ट केले.‘जॉइंट सर्व्हिस कमेंडेशन मेडल’ हे अमेरिकन लष्करातील उच्च दर्जाच्या पुरस्कारांपैकी एक मानले जाते. सामान्यतः कनिष्ठ पदावरील सैनिकांना हा पुरस्कार दिला जात नाही.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode