
तेहरान, 13 नोव्हेंबर (हिं.स.)।इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव सातत्याने वाढत आहे. अशातच इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सने (आयआरजीसी) बहरीनमध्ये अमेरिकेची पूर्वसूचना देणारी रडार यंत्रणा उद्ध्वस्त केल्याचा दावा केला आहे. आयआरजीसीने ही कारवाई अमेरिकेसाठी गंभीर इशारा असल्याचे म्हटले आहे. तसेच अमेरिकेने पुन्हा इराणवर हल्ला करण्याचा किंवा त्याच्या सीमांचे उल्लंघन करण्याचा प्रयत्न केल्यास यापूर्वीपेक्षाही कठोर प्रत्युत्तर दिले जाईल, अशी धमकी दिली आहे.
आयआरजीसीच्या म्हणण्यानुसार, इराणच्या सिरिक भागातील दूरसंचार मनोऱ्यावर अमेरिकेने कथित हवाई हल्ला केला होता. त्याला प्रत्युत्तर म्हणून आयआरजीसीच्या एरोस्पेस दलाने ही कारवाई केली. अमेरिकेच्या हल्ल्यानंतर सुमारे तासाभरात त्यांच्या जवानांनी बहरीन बेटावरील अमेरिकी लष्कराच्या पूर्वसूचना देणाऱ्या रडार यंत्रणेला लक्ष्य करून ती उद्ध्वस्त केल्याचा दावा संघटनेने केला आहे. आयआरजीसीने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, अमेरिकेची रडार यंत्रणा उद्ध्वस्त करण्यामागचा उद्देश अमेरिकेला आपल्या हवाई हालचाली थांबवण्याचा इशारा देणे हा होता. याशिवाय, सामरिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या होर्मुझच्या सामुद्रधुनीतून अमेरिका तेलाची तस्करी करत असल्याचा आरोपही आयआरजीसीने केला आहे.
आयआरजीसीच्या म्हणण्यानुसार, इराणच्या सिरिक भागातील दूरसंचार मनोऱ्यावर अमेरिकेने कथित हवाई हल्ला केला होता. त्याला प्रत्युत्तर म्हणून आयआरजीसीच्या एरोस्पेस दलाने ही कारवाई केली. अमेरिकेच्या हल्ल्यानंतर सुमारे तासाभरात त्यांच्या जवानांनी बहरीन बेटावरील अमेरिकी लष्कराच्या पूर्वसूचना देणाऱ्या रडार यंत्रणेला लक्ष्य करून ती उद्ध्वस्त केल्याचा दावा संघटनेने केला आहे.आयआरजीसीने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, अमेरिकेची रडार यंत्रणा उद्ध्वस्त करण्यामागचा उद्देश अमेरिकेला आपल्या हवाई हालचाली थांबवण्याचा इशारा देणे हा होता. याशिवाय, सामरिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या होर्मुझच्या सामुद्रधुनीतून अमेरिका तेलाची तस्करी करत असल्याचा आरोपही आयआरजीसीने केला आहे.
आयआरजीसीने अमेरिकेला इशारा देताना म्हटले आहे की, बहरीनमधील अमेरिकी रडार यंत्रणा उद्ध्वस्त करणे हा आक्रमक शत्रूसाठी गंभीर इशारा होता. अमेरिकेच्या चिथावणीखोर हवाई हालचाली आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीतील तेलाची तस्करी रोखणे हा या कारवाईमागील उद्देश आहे. शत्रूने पुन्हा आमच्या सीमांचे उल्लंघन केले किंवा आक्रमक कारवाई केली, तर आयआरजीसीचे एरोस्पेस दल कोणतीही मर्यादा न ठेवता प्रत्युत्तर देण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे.
दरम्यान, इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बघाई यांनीही अमेरिकेला मदत करणाऱ्या इतर देशांना इशारा दिला आहे. इराणविरोधातील अमेरिकी लष्करी मोहिमेत कोणत्याही देशाने प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे मदत केली, तर त्या देशालाही इराणविरोधातील आक्रमक कारवाईत सहभागी मानले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.बघाई यांनी ‘एक्स’वरील पोस्टमध्ये संयुक्त राष्ट्रांची सनद आणि आंतरराष्ट्रीय कायद्याचा संदर्भ देत इतर देशांना सावध केले. यावेळी त्यांनी एका कोरियन म्हणीचाही उल्लेख केला. ते म्हणाले, ‘जो चिमणी करकोच्याच्या मागे उडण्याचा प्रयत्न करतो, त्याचे अखेर पाय मोडतात.’या म्हणीच्या माध्यमातून अमेरिकेच्या बाजूने उभे राहून इराणविरोधात भूमिका घेणाऱ्या देशांना गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा त्यांनी दिला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode