
इस्लामाबाद, 13 नोव्हेंबर (हिं.स.)।पाकिस्तानी लष्कराने शुक्रवारी बलुचिस्तान आणि खैबर पख्तूनख्वा या प्रांतांमध्ये ७४ दहशतवाद्यांना ठार केल्याचा दावा केला आहे. लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, या अशांत प्रांतांमध्ये गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे अनेक ठिकाणी कारवाया करण्यात आल्या. ३ नोव्हेंबरपासून सुरू असलेल्या या मोहिमेदरम्यान पाकिस्तानी सुरक्षा दलांनी किमान ७४ दहशतवाद्यांना ठार केले आहे.
पाकिस्तानच्या अशांत बलुचिस्तान आणि खैबर पख्तूनख्वा या प्रांतांमध्ये ही कारवाई करण्यात आली. पाकिस्तानी लष्कराच्या माध्यम विभागाने म्हणजेच ‘इंटर-सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्स’ने (आयएसपीआर) यासंदर्भात निवेदन जारी केले आहे. या निवेदनानुसार, ३ नोव्हेंबरपासून बलुचिस्तानमधील क्वेटा जिल्ह्यातील कुर्रम परिसरात, तसेच खैबर पख्तूनख्वा प्रांतातील मीर अली आणि ओरकझई या भागांत लष्करी मोहिमा राबवण्यात आल्या. गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे करण्यात आलेल्या या कारवायांमध्ये दहशतवाद्यांच्या अनेक तळांना लक्ष्य करण्यात आले. यावेळी झालेल्या अनेक चकमकींमध्ये ‘तेहरीक-ए-तालिबान’चे ३१ दहशतवादी मारले गेल्याचा दावा लष्कराने केला आहे. घटनास्थळावरून शस्त्रे, दारूगोळा आणि स्फोटकेही जप्त करण्यात आली आहेत.
लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या ४८ तासांत राबवण्यात आलेल्या वेगवेगळ्या कारवायांमध्ये मीर अली परिसरात ३५, तर ओरकझई भागात आठ दहशतवाद्यांना ठार करण्यात आले.
लष्कराने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, दहशतवादी धोक्यांचा पूर्णपणे नायनाट करण्यासाठी आणि त्यांच्या नेटवर्कचा बिमोड करण्यासाठी खैबर पख्तूनख्वा प्रांतात गुप्तचर माहितीच्या आधारे अनेक मोहिमा राबवल्या जात आहेत. या मोहिमांचा विस्तार आता मीर अली आणि ओरकझई परिसरापर्यंत करण्यात आला आहे.
या कारवाईदरम्यान मोठ्या प्रमाणात शस्त्रे, दारूगोळा आणि स्फोटकांचा साठा जप्त करण्यात आल्याचेही लष्कराने सांगितले. यामध्ये घरगुती पद्धतीने तयार करण्यात आलेली स्फोटके आणि इम्प्रोव्हाइज्ड एक्सप्लोसिव्ह डिव्हाइसेस (आयईडी) यांचाही समावेश आहे. दरम्यान, २०२१ मध्ये अफगाणिस्तानमध्ये तालिबानने सत्तेवर ताबा मिळवल्यानंतर पाकिस्तानमधील दहशतवादी कारवायांमध्ये मोठी वाढ झाली आहे. विशेषतः खैबर पख्तूनख्वा आणि बलुचिस्तान या प्रांतांमध्ये दहशतवादी हिंसाचाराच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचे चित्र आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode