
वॉशिंग्टन, 13 नोव्हेंबर (हिं.स.)। मायक्रोसॉफ्टच्या जागतिक स्तरावरील तांत्रिक बिघाडामुळे शुक्रवारी अनेक देशांमधील व्यावसायिक व्यवहार आणि सरकारी कामकाजावर मोठा परिणाम झाला. हाँगकाँगमध्ये बँकिंग सेवा विस्कळीत झाल्या, तर ऑस्ट्रेलिया आणि जपानमधील सरकारी यंत्रणांनाही तांत्रिक समस्यांचा सामना करावा लागला. फिलिपाइन्समधील न्यायालयांच्या कामकाजातही विलंब झाल्याची माहिती समोर आली आहे. गुरुवारी सुरू झालेल्या या तांत्रिक बिघाडामुळे लाखो वापरकर्त्यांना आउटलुक, मायक्रोसॉफ्ट टीम्स आणि मायक्रोसॉफ्ट ३६५ मधील इतर महत्त्वाच्या सेवांचा वापर करण्यात अडचणी आल्या.
अमेरिकेतील तंत्रज्ञान कंपनी मायक्रोसॉफ्टने या समस्येची पहिल्यांदा माहिती दिल्यानंतर १२ तासांहून अधिक काळ उलटूनही कंपनीचे अभियंते सेवा पूर्णपणे पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न करत होते.मायक्रोसॉफ्टने काही प्रमाणात प्रगती झाल्याचे सांगितले असले, तरी सेवा सुधारण्यासाठी केलेले प्रयत्न अपेक्षेप्रमाणे यशस्वी होत नसल्याची कबुलीही कंपनीने दिली. या तांत्रिक बिघाडामागे कोणत्याही प्रकारची घातपाती किंवा दुर्भावनापूर्ण कृती असल्याचा पुरावा आढळला नसल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.मॉर्गन स्टॅन्ली आणि गोल्डमन सॅक्स यांसारख्या मोठ्या वित्तीय संस्थांमधील कर्मचाऱ्यांनी ई-मेल आणि मायक्रोसॉफ्ट टीम्स वापरण्यात अडचणी येत असल्याचे सांगितले. त्यामुळे त्यांच्या दैनंदिन कामकाजात व्यत्यय निर्माण झाला. माध्यमांशी बोलताना एका बँकरने सांगितले की, काही ई-मेल प्राप्त होत असले तरी लाखो संदेश तांत्रिक अडचणींमुळे प्रलंबित राहिले असण्याची शक्यता आहे.परदेशी ग्राहकांशी संवाद साधण्यावर अवलंबून असलेल्या व्यावसायिक संस्थांनाही या बिघाडाचा मोठा फटका बसला आहे.
ऑस्ट्रेलियामध्ये शाळा, न्यायालये आणि सरकारी सेवांचे कामकाज प्रभावित झाले. कर्मचाऱ्यांना आउटलुकसह मायक्रोसॉफ्टची इतर ॲप्लिकेशन्स सुरू करण्यात अडचणी येत होत्या. ऑस्ट्रेलियाचे गृहमंत्री टोनी बर्क यांनी सांगितले की, मायक्रोसॉफ्टने या घटनेची तुलना जुलै २०२४ मध्ये झालेल्या क्राऊडस्ट्राइकच्या जागतिक तांत्रिक बिघाडाशी केली आहे.बर्क यांनी ऑस्ट्रेलियातील मायक्रोसॉफ्टच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी आणि सरकारच्या राष्ट्रीय सायबर सुरक्षा समन्वयकाशी चर्चा केल्याचे सांगितले. मायक्रोसॉफ्टच्या मते, ही सायबर हल्ल्याची घटना नसून एखाद्या सॉफ्टवेअर अपडेटशी संबंधित तांत्रिक समस्या असण्याची शक्यता आहे.
जपानमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना कागदपत्रांचा आधार या तांत्रिक बिघाडाचा परिणाम जपानच्या सरकारी माहिती-तंत्रज्ञान यंत्रणेवरही झाला. शुक्रवारी कामकाजाच्या वेळेत अनेक मंत्रालये आणि सरकारी विभागांना ई-मेल पाठवताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. जपानचे उपमुख्य मंत्रिमंडळ सचिव मसानाओ ओझाकी यांनी सांगितले की, सरकारी कर्मचारी आता कामकाज सुरू ठेवण्यासाठी कागदपत्रांच्या छापील प्रतींचा वापर करत आहेत.सिंगापूरच्या सरकारी तंत्रज्ञान संस्थेनेही सरकारी ई-मेल सेवा ठप्प झाल्याची माहिती दिली. ही समस्या सोडवण्यासाठी मायक्रोसॉफ्टसोबत मिळून काम सुरू असल्याचे संस्थेने स्पष्ट केले.
भारतात इंडिगोने या तांत्रिक बिघाडामुळे त्यांच्या ई-मेल ग्राहक सहाय्य सेवांवर परिणाम झाल्याचे सांगितले. त्यामुळे ग्राहकांचे प्रश्न आणि तक्रारी प्राप्त करण्यात अडचणी येत होत्या. मात्र, ग्राहक सहाय्याची इतर माध्यमे सुरू होती आणि विमानांच्या उड्डाणांवर कोणताही परिणाम झाला नसल्याचे कंपनीने स्पष्ट केले.अकासा एअरनेही प्रवाशांसाठी सूचना जारी केली. ई-मेलद्वारे दिल्या जाणाऱ्या ग्राहक सहाय्य सेवांमध्ये विलंब होऊ शकतो, अशी माहिती कंपनीने प्रवाशांना दिली.
अमेरिकेतील अनेक शहरांच्या प्रशासनांनी ई-मेल सेवांमध्ये मोठ्या प्रमाणावर अडचणी निर्माण झाल्याची माहिती दिली. गरज पडल्यास नागरिकांनी स्थानिक सरकारी कार्यालयांशी फोनद्वारे संपर्क साधावा, असा सल्ला प्रशासनाकडून देण्यात आला.औद्योगिक तंत्रज्ञान क्षेत्रातील वर्कहॉर्स ग्रुप या कंपनीलाही या बिघाडाचा फटका बसला. त्यामुळे कंपनीने तिमाही आर्थिक निकालांसंदर्भातील चर्चेसाठी आयोजित केलेली परिषद पुढे ढकलली.दरम्यान, ओपनएआय आणि अँथ्रोपिक या कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील कंपन्यांनीही मायक्रोसॉफ्ट ३६५ मधील साधनांशी जोडणी करण्यात अडचणी येत असल्याची माहिती दिली. यावरून मायक्रोसॉफ्टच्या तांत्रिक बिघाडाचा परिणाम केवळ कंपनीच्या स्वतःच्या सेवांपुरता मर्यादित नसून, मायक्रोसॉफ्टच्या सॉफ्टवेअरशी जोडणीवर अवलंबून असलेल्या इतर डिजिटल प्लॅटफॉर्मवरही झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode