
लातूर, 13 नोव्हेंबर (हिं.स.) पोलीस गणवेशात मद्यप्राशन करून सार्वजनिक ठिकाणी बेशिस्त वर्तन केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने लातूर पोलीस दलाची प्रतिमा चर्चेत आली आहे. या प्रकरणाची पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी गंभीर दखल घेत संबंधित पोलीस अंमलदाराविरुद्ध कठोर विभागीय कारवाईची प्रक्रिया सुरू केली आहे.
लातूर पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गणपत गोपीनाथ पवार हे ३ नोव्हेंबर २०२६ पासून वैद्यकीय रजेवर आहेत. दिवाळीनिमित्त ते पुणे येथे कुटुंबीय व नातेवाईकांकडे गेले होते. याचदरम्यान पुणे रेल्वे स्टेशन परिसरात पोलीस गणवेशात मद्यप्राशन करून झोपलेल्या अवस्थेत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित झाला.
या व्हिडिओची माहिती लातूर पोलीस नियंत्रण कक्षाला मिळाल्यानंतर त्याची खातरजमा करण्यात आली. संबंधित अंमलदाराने मद्यप्राशन केल्याची बाबही समोर आली असून, यासंदर्भात रेल्वे पोलिसांचा अहवाल प्राप्त झाला आहे.
पोलीस गणवेश हा कायद्याचे रक्षण, शिस्त, कर्तव्यनिष्ठा आणि जनतेच्या विश्वासाचे प्रतीक मानला जातो. अशा गणवेशात मद्यप्राशन करून सार्वजनिक ठिकाणी बेशिस्त वर्तन करणे ही पोलीस दलाच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवणारी गंभीर बाब असल्याचे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
या घटनेची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी संबंधित सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाविरुद्ध नियमानुसार कठोर विभागीय कारवाईची प्रक्रिया सुरू केली आहे. पोलीस दलात शिस्त आणि कर्तव्यनिष्ठेला सर्वोच्च प्राधान्य असून, गणवेशाचा अवमान करणारे किंवा दलाची प्रतिमा मलिन करणारे वर्तन कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाही, असा स्पष्ट संदेश या कारवाईतून देण्यात आला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis