नाशिक : आडगावात मांस विक्रेत्यावर हल्ला, गुन्हा दाखल
नाशिक, १३ नोव्हेंबर (हिं.स.) : फुकट मटण देण्यास नकार दिल्याच्या कारणावरून पाच अज्ञात इसमांनी चिकन-मटण दुकानदारावर हल्ला केल्याची घटना आडगाव शिवारातील राऊत मळा परिसरात घडली. या हल्ल्यात दुकानदार महंमद खालिक सलिम खाटीक जखमी झाले असून, याप्रकरणी आडगाव
नाशिक : आडगावात मांस विक्रेत्यावर हल्ला, गुन्हा दाखल


नाशिक, १३ नोव्हेंबर (हिं.स.) : फुकट मटण देण्यास नकार दिल्याच्या कारणावरून पाच अज्ञात इसमांनी चिकन-मटण दुकानदारावर हल्ला केल्याची घटना आडगाव शिवारातील राऊत मळा परिसरात घडली. या हल्ल्यात दुकानदार महंमद खालिक सलिम खाटीक जखमी झाले असून, याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात पाच अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, महंमद खालिक सलिम खाटीक (रा. नांदूर गाव, ता. जि. नाशिक) यांचे आडगाव शिवारातील राऊत मळा येथे 'सादिक चिकन शॉप' नावाचे दुकान आहे. घटनेच्या वेळी ते त्यांचा भाऊ सादिक इस्माईल आणि साला अदनान यांच्यासह दुकानात चिकन-मटण विक्री करीत होते.यावेळी पाच अनोळखी इसम दुकानात आले. त्यांनी चार किलो मटणाची मागणी केली. त्यावर दुकानदाराने पैसे रोख देणार की ऑनलाइन, अशी विचारणा केली. मात्र, संबंधित इसमांनी आम्ही मटण फुकट घेऊन जाणार असल्याचे सांगितले. दुकानदाराने फुकट मटण देण्यास स्पष्ट नकार दिल्याने आरोपी संतप्त झाले.

या रागातून पाचही इसमांनी दुकानदारासोबत वाद घालत मारहाण सुरू केली. यावेळी एका आरोपीने दुकानाजवळ पडलेली फरशी उचलून फिर्यादीच्या डोक्यात मारली. तर दुसऱ्या आरोपीनेही डोक्यात वस्तूने प्रहार करून त्यांना जखमी केले.या घटनेप्रकरणी महंमद खालिक सलिम खाटीक यांच्या फिर्यादीवरून आडगाव पोलीस ठाण्यात पाच अज्ञात इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.

--------------------

हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI


 rajesh pande