

रायगड, 13 नोव्हेंबर (हिं.स.)। खोपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भानवज येथील इंद्रप्रस्थ इमारतीतील फ्लॅटमध्ये एका महिलेची हत्या करून तिच्या अंगावरील सोन्याचे दागिने लुटल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. चोरीच्या उद्देशाने घरात शिरलेल्या अज्ञात आरोपीने महिलेचे हात-पाय कपड्याने बांधून ओढणीने गळा आवळून तिची हत्या केली.
भानवज येथील इंद्रप्रस्थ इमारतीमधील फ्लॅट क्रमांक ४ मध्ये ही घटना घडली. आरोपीने घरात प्रवेश करून महिलेचे हात-पाय बांधले आणि गळा आवळून तिला ठार मारले. त्यानंतर तिच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र आणि हातातील तीन सोन्याच्या बांगड्या जबरदस्तीने काढून चोरून नेल्या.
या प्रकरणी खोपोली पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ४०१/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १०३(१), ३११ आणि ३३१(७) नुसार अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गंभीर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सचिन हिरे करीत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)