
कुमामोटो, 13 नोव्हेंबर (हिं.स.)। भारताचा अनुभवी बॅडमिंटनपटू किदांबी श्रीकांतचा जपान मास्टर्समधील प्रवास शुक्रवारी उपांत्यपूर्व फेरीत संपुष्टात आला. जपानच्या कोकी वतनबेने त्याचा २२-२४, १५-२१ असा पराभव केला. हा सामना ४१ मिनिटे चालला.
पहिला गेम अत्यंत चुरशीचा झाला. दोन्ही खेळाडूंमध्ये २० गुणांनंतरही अटीतटीची लढत सुरू होती. मायदेशातील प्रेक्षकांचा पाठिंबा मिळालेल्या वतनबेने दबावाच्या क्षणी उत्कृष्ट खेळ करत २४-२२ असा पहिला गेम जिंकला. दुसऱ्या गेममध्ये श्रीकांतने शानदार सुरुवात करत मध्यंतरापर्यंत ११-५ अशी आघाडी मिळवली. त्यानंतरही तो १४-९ ने आघाडीवर होता. मात्र, वतनबेने जोरदार पुनरागमन केले. १४-९ ने पिछाडीवर असलेल्या जपानी खेळाडूने पुढील १३ गुणांपैकी तब्बल १२ गुण जिंकत दुसरा गेम २१-१५ असा आपल्या नावावर केला. अशा प्रकारे सरळ दोन गेममध्ये विजय मिळवत त्याने उपांत्य फेरीत प्रवेश केला.
पराभव झाला असला तरी श्रीकांतसाठी ही स्पर्धा एकंदरीत चांगली ठरली. यापूर्वी त्याने पाचवे मानांकन असलेल्या आणि मायदेशातील प्रबळ दावेदार खेळाडू कोडाई नाराओका याचा पाचव्या सामन्यात प्रथमच पराभव केला होता. श्रीकांतने नाराओकाविरुद्ध २१-१५, ११-२१, २१-१८ असा विजय मिळवला होता. दुसऱ्या गेममध्ये मोठ्या फरकाने पराभव झाल्यानंतर त्याने निर्णायक गेममध्ये दमदार पुनरागमन करत सामना जिंकला होता.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule