चौथ्या एकदिवसीय सामन्यात भारताचा लाजिरवाणा पराभव; न्यूझीलंडचा २४४ धावांनी दणदणीत विजय
३३४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघ ८९ धावांत गारद; मॅट हेन्रीचे सहा बळी पाच सामन्यांच्या मालिकेत भारत २-१ ने आघाडीवर माउंट माउंगानुई, 13 नोव्हेंबर (हिं.स.)। न्यूझीलंडने शुक्रवारी चौथ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय क्रिकेट संघाचा २४४ धा
Sports Cricket NZ bt India 244 Runs 4rth ODI


३३४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघ ८९ धावांत गारद; मॅट हेन्रीचे सहा बळी

पाच सामन्यांच्या मालिकेत भारत २-१ ने आघाडीवर

माउंट माउंगानुई, 13 नोव्हेंबर (हिं.स.)। न्यूझीलंडने शुक्रवारी चौथ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय क्रिकेट संघाचा २४४ धावांनी दारुण पराभव करत पाच सामन्यांच्या मालिकेत दमदार पुनरागमन केले. मात्र, या लाजिरवाण्या पराभवानंतरही भारतीय संघ मालिकेत २-१ ने आघाडीवर आहे. तिसरा सामना पावसामुळे रद्द झाला होता. आता दोन्ही संघांमधील अखेरचा सामना १५ नोव्हेंबर रोजी खेळवला जाणार आहे.

बे ओव्हल मैदानावर ३३४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेला भारतीय संघ २६.४ षटकांत अवघ्या ८९ धावांवर गारद झाला. न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज मॅट हेन्रीने भेदक गोलंदाजी करत सहा बळी घेत भारतीय फलंदाजीचा क्रम पूर्णपणे उद्ध्वस्त केला. यापूर्वी विल यंगच्या शानदार शतकी खेळीच्या जोरावर न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत ३३३ धावा केल्या होत्या.

धावांच्या फरकाने भारताचा एकदिवसीय क्रिकेटमधील दुसरा सर्वात मोठा पराभव

धावांच्या फरकाने हा एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील भारताचा दुसरा सर्वात मोठा पराभव आहे. यापूर्वी २९ ऑक्टोबर २००० रोजी शारजाह येथे श्रीलंकेविरुद्ध भारतीय संघाला २४५ धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. त्या सामन्यात सनथ जयसूर्याच्या १८९ धावांच्या जोरावर श्रीलंकेने २९९ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारतीय संघ २६.३ षटकांत अवघ्या ५४ धावांवर गारद झाला होता. आता न्यूझीलंडविरुद्धचा २४४ धावांचा पराभव या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आला आहे.

पहिल्याच षटकात भारताला तीन मोठे धक्के

३३४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात अत्यंत खराब झाली. न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज मॅट हेन्रीने पहिल्याच षटकात भारतीय फलंदाजीचे कंबरडे मोडले. त्याने पहिल्याच चेंडूवर रोहित शर्माला तंबूत धाडले. त्यानंतर विराट कोहली आणि कर्णधार श्रेयस अय्यर हेही खाते न उघडताच बाद झाले. अशा प्रकारे भारतीय संघाने पहिल्याच षटकात एकही धाव न करता तीन महत्त्वाचे बळी गमावले.

सुरुवातीच्या धक्क्यांतून भारतीय संघाला सावरता आले नाही. ऋतुराज गायकवाड पाच धावा करून बाद झाला. इशान किशनने ५३ चेंडूंत २७ धावा करत काही काळ संघर्ष केला; मात्र त्याला दुसऱ्या बाजूने अपेक्षित साथ मिळाली नाही. अक्षर पटेल आणि नमन धीर यांनी प्रत्येकी २१ धावा केल्या. आकिब नबीने पाच आणि गुरनूर बरारने दोन धावा केल्या, तर कुलदीप यादव एक धाव करून बाद झाला. अर्शदीप सिंह खाते न उघडता नाबाद राहिला. न्यूझीलंडकडून मॅट हेन्री सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने ९.४ षटकांत २७ धावा देत सहा बळी घेतले. मॅथ्यू फिशरने तीन बळी मिळवले. अशा प्रकारे भारतीय संघाचा डाव ८९ धावांवर संपुष्टात आला आणि न्यूझीलंडने २४४ धावांनी सामना जिंकला.

यंगचे शतक आणि सेफर्टच्या खेळीमुळे न्यूझीलंडची मोठी धावसंख्या

यापूर्वी भारतीय कर्णधाराने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. न्यूझीलंडचे सलामीवीर विल यंग आणि टिम सेफर्ट यांनी संघाला मजबूत सुरुवात करून दिली. दोघांनी पहिल्या गड्यासाठी ८५ धावांची भागीदारी केली. सेफर्टने ४८ चेंडूंत सहा चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने ५८ धावा केल्या. फिन अॅलननेही आक्रमक फलंदाजी केली. त्याने ३० चेंडूंत ४१ धावा केल्या. दुसऱ्या बाजूला विल यंगने भारतीय गोलंदाजांचा ठामपणे सामना करत शानदार शतक झळकावले. यंगने १०८ चेंडूंत १४ चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने १२५ धावांची खेळी केली.

यंगव्यतिरिक्त मायकेल ब्रेसवेलने १५, कर्णधार मिचेल सँटनरने २४ आणि क्रिस्टियन क्लार्कने २२ धावा केल्या. काइल जेमिसन १९ धावांवर नाबाद राहिला. अशा प्रकारे न्यूझीलंडचा संघ निर्धारित ५० षटकांत ३३३ धावा करण्यात यशस्वी ठरला. भारताकडून अक्षर पटेल, गुरनूर बरार आणि आकिब नबी यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. अर्शदीप सिंह आणि नमन धीर यांना प्रत्येकी एक बळी मिळाला. शानदार शतकी खेळीसाठी विल यंगला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.

भारत एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वात मोठ्या पराभवापासून अवघ्या एका धावेने दूर

न्यूझीलंडविरुद्धच्या २४४ धावांच्या पराभवामुळे भारतीय एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासातील जुन्या विक्रमाची आठवण झाली. धावांच्या फरकाने भारताचा सर्वात मोठा पराभव २४५ धावांचा आहे. हा पराभव २९ ऑक्टोबर २००० रोजी शारजाह येथे श्रीलंकेविरुद्ध झाला होता. त्या सामन्यात भारतीय संघ अवघ्या ५४ धावांवर गारद झाला होता. आता १३ नोव्हेंबर २०२६ रोजी न्यूझीलंडविरुद्ध झालेला २४४ धावांचा पराभव या विक्रमापासून केवळ एका धावेने मागे आहे.

धावांच्या फरकाने भारताचे पाच सर्वात मोठे एकदिवसीय पराभव पुढीलप्रमाणे —

1) २४५ धावा – श्रीलंकेविरुद्ध, शारजाह, २९ ऑक्टोबर २०००.

2) २४४ धावा – न्यूझीलंडविरुद्ध, माउंट माउंगानुई, १३ नोव्हेंबर २०२६.

3) २१४ धावा – दक्षिण आफ्रिकेविरुद्ध, मुंबई, २५ ऑक्टोबर २०१५.

4) १८० धावा – पाकिस्तानविरुद्ध, लंडन, १८ जून २०१७.

5) १६१ धावा – श्रीलंकेविरुद्ध, किंग्स्टन, २ जुलै २०१३.

मात्र, ८९ धावांवर गारद होणे हा एकदिवसीय क्रिकेटमधील भारताचा सर्वात कमी धावसंख्येचा विक्रम नाही. भारतीय संघाची एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वात कमी धावसंख्या ५४ धावा आहे. हा विक्रम २००० मध्ये श्रीलंकेविरुद्ध नोंदवला गेला होता. भारताच्या सर्वात कमी धावसंख्यांच्या यादीत त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध १९८१ मध्ये ६३ धावा, श्रीलंकेविरुद्ध १९८६ मध्ये ७८ धावा, पाकिस्तानविरुद्ध १९७८ मध्ये ७९ धावा आणि न्यूझीलंडविरुद्ध २०१० मध्ये ८८ धावांची नोंद आहे.

मालिकेत भारत अद्याप आघाडीवर

या दारुण पराभवानंतरही भारतीय संघ पाच सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत २-१ ने आघाडीवर आहे. तिसरा सामना पावसामुळे रद्द झाला होता. आता मालिकेतील पाचवा आणि अखेरचा सामना १५ नोव्हेंबर रोजी खेळवला जाणार आहे. अंतिम सामन्यात विजय मिळवून मालिका आपल्या नावावर करण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असेल, तर न्यूझीलंडचा संघ मालिका बरोबरीत आणण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande