
न्यूयॉर्क, 13 नोव्हेंबर (हिं.स.)। अर्जेंटिनाचा दिग्गज फुटबॉलपटू लिओनेल मेसी सलग तिसऱ्या वर्षी मेजर लीग सॉकर (एमएलएस) स्पर्धेतील प्रतिष्ठेच्या लँडन डोनोव्हन मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर (एमव्हीपी) पुरस्काराच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. गुरुवारी लीगने हंगामाच्या अखेरीस प्रदान करण्यात येणाऱ्या आठ वैयक्तिक पुरस्कारांसाठी अंतिम फेरीतील खेळाडूंची नावे जाहीर केली. एमव्हीपी पुरस्काराच्या शर्यतीत मेसीसोबत १७ वर्षीय उदयोन्मुख खेळाडू कॅव्हन सुलिव्हन याचाही समावेश आहे.
इंटर मियामीकडून शानदार कामगिरी करणाऱ्या मेसीने गेल्या सलग दोन हंगामांत हा पुरस्कार पटकावला होता. यंदाही तो या पुरस्काराचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. त्याने नियमित हंगामात लीगमध्ये सर्वाधिक २६ गोल केले आहेत. तसेच त्याच्या नावावर १७ असिस्ट असून, ही कामगिरी लीगमध्ये दुसऱ्या क्रमांकाची आहे.
एमव्हीपी पुरस्कारासाठी मेसी आणि सुलिव्हन यांच्याशिवाय एफसी सिनसिनाटीचा इव्हांडर, ह्यूस्टन डायनॅमोचा गिलहर्मे आणि नॅशव्हिल एससीचा हानी मुख्तार हे अंतिम फेरीतील दावेदार आहेत.
सिगी श्मिड कोच ऑफ द इयर पुरस्कारासाठी नॅशव्हिलचे बीजे कॅलाघन, सेंट लुईस सिटीचे योआन डामे आणि व्हँकुव्हर व्हाइटकॅप्सचे जेस्पर सोरेन्सन यांच्यात चुरस आहे. कॅलाघन यांच्या मार्गदर्शनाखाली नॅशव्हिल संघाने २३ विजय, तीन पराभव आणि आठ सामने अनिर्णित राखत एकूण ७७ गुण मिळवून सपोर्टर्स शिल्ड पटकावली.
डिफेंडर ऑफ द इयर पुरस्कारासाठी नॅशव्हिलचे तीन खेळाडू अँडी नाझार, जेइसन पलासिओस आणि मॅक्सवेल वोल्डेजी अंतिम फेरीत आहेत. तर गोलकीपर ऑफ द इयर पुरस्काराच्या शर्यतीत नॅशव्हिलचा ब्रायन श्वाके, सेंट लुईस सिटीचा रोमन बुर्की आणि न्यू इंग्लंड रिव्होल्यूशनचा मॅट टर्नर यांचा समावेश आहे.
कमबॅक प्लेयर ऑफ द इयर पुरस्कारासाठी व्हँकुव्हर व्हाइटकॅप्सचा रायन गोल्ड, सिनसिनाटीचा निक हेगलंड आणि सॅन होजे अर्थक्वेक्सचा एडुआर्ड लोवेन हे अंतिम फेरीतील दावेदार आहेत. न्यूकमर ऑफ द इयर पुरस्कारासाठी गिलहर्मे, ऑर्लँडो सिटीचा अँटोनी ग्रीझमन आणि स्पोर्टिंग कॅन्सस सिटीचा आंद्रे लुईझ यांच्यात स्पर्धा असेल.
यंग प्लेयर ऑफ द इयर पुरस्कारासाठीही कॅव्हन सुलिव्हन अंतिम फेरीत पोहोचला आहे. फिलाडेल्फिया युनियनकडून खेळताना त्याने २९ सामन्यांत नऊ गोल आणि १४ असिस्ट केले आहेत. यापैकी २१ सामन्यांत तो सुरुवातीच्या अकरा खेळाडूंमध्ये होता. न्यूयॉर्क रेड बुल्सचा ज्युलियन हॉल आणि एद्री मेहेमती हे देखील या पुरस्काराचे दावेदार आहेत.
ह्युमॅनिटेरियन ऑफ द इयर पुरस्कारासाठी सिएटल साउंडर्सचा पॉल अरिओला, न्यू इंग्लंड रिव्होल्यूशनचा अँड्र्यू फॅरेल, इंटर मियामीचा तेलास्को सेगोव्हिया, रियल सॉल्ट लेकचा मेसन स्टजडुहार आणि ऑस्टिन एफसीचा ब्रॅड स्टुव्हर यांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली आहे.
या आठही पुरस्कारांच्या विजेत्यांची घोषणा आगामी प्लेऑफ सामन्यांदरम्यान करण्यात येणार आहे. एमएलएस बेस्ट इलेव्हनची घोषणाही त्यानंतर केली जाईल. गोल ऑफ द इयर आणि सेव्ह ऑफ द इयर पुरस्कारांसाठी एमएलएसच्या अधिकृत संकेतस्थळावर सोमवारपर्यंत ऑनलाइन मतदान सुरू राहणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule