
मुंबई, 14 नोव्हेंबर (हिं.स.) - एंजल वन भारतातील दुसरी सर्वांत मोठी स्टॉक ब्रोकर ठरली, ७० लाख सक्रिय ग्राहकांचा टप्पा गाठण्याच्या जवळ पोहोचली आहे.
ब्रोकरेजने एकट्या ऑक्टोबर महिन्यात एनएसईवर २.४३ लाख निव्वळ सक्रिय ग्राहकांची भर घातली, तसेच दुसऱ्या तिमाहीत १५ लाख नवीन ग्राहक जोडत गेल्या महिन्यात ४ कोटी ग्राहकांचा टप्पा ओलांडला.
एनएसईच्या ताज्या रिपोर्टसनुसार, एंजल वन लिमिटेडने (NSE: ANGELONE, BSE: 543235) सक्रिय ग्राहकांच्या संख्येच्या दृष्टीने दुसरे स्थान मिळवून भारतातील स्टॉक ब्रोकिंग उद्योगातील आपले स्थान अधिक दृढ केले आहे. ६९.९८ लाख सक्रिय ग्राहकसंख्येसह या ब्रोकरेजचे आता एक्स्चेंजवरील सर्व ब्रोकर्सच्या ४.६७ कोटी सक्रिय ग्राहकांपैकी १४.९७ टक्के प्रमाण आहे.
कंपनीने एकट्या ऑक्टोबर महिन्यात एनएसईवर २.४३ लाख निव्वळ सक्रिय ग्राहकांची भर घातली आहे, ज्यामधून भारतातील किरकोळ गुंतवणूकदारांमध्ये डिजिटल गुंतवणूक आणि ट्रेडिंग प्लॅटफॉर्मचा वाढता वापर दिसून येतो. ही उपलब्धी गुंतवणूकदारांचा सहभाग वाढवण्यावर एंजल वनचा सातत्यपूर्ण भर आणि तंत्रज्ञान-आधारित उपायांद्वारे भांडवली बाजारपेठेतील प्रवेश अधिक सुलभ करण्याचे प्रयत्न दर्शवते.
कंपनीच्या ऑक्टोबर २०२६ च्या व्यावसायिक कामगिरीने या वाढीच्या मार्गाला अधिक गती दिली आहे. कंपनीचा एकूण ग्राहकवर्ग ४०.६० दशलक्षांवर पोहोचला आहे, ज्यामध्ये वार्षिक १७.४ टक्के वाढ नोंदवली गेली आहे, तर एकूण नवीन ग्राहक नोंदणीने ०.६६ दशलक्षांचा नऊ महिन्यांतील उच्चांक गाठला आहे. ट्रेडिंग सहभागही वाढला आहे आणि सरासरी दैनंदिन ऑर्डर्स मासिक आधारावर १९.६ टक्के वाढून ६.९७ दशलक्षांवर पोहोचल्या आहेत.
या महत्त्वपूर्ण टप्प्याला आर्थिक वर्ष २०२७ च्या दुसऱ्या तिमाहीतील (जुलै-सप्टेंबर २०२६) उत्तम आर्थिक कामगिरीचे पाठबळ लाभले आहे. कामकाजातून मिळणारा एकत्रित महसूल वार्षिक आधारावर १८.७ टक्के वाढून १,४२७ कोटी रुपयांवर पोहोचला, तर निव्वळ नफा ५८.२ टक्के वाढून ३३५ कोटी रुपये झाला. ईबीडीएटी ५२ टक्के वाढून ४९३ कोटी रुपयांवर पोहोचला, ज्यामध्ये ईबीडीएटी मार्जिन गेल्या वर्षीच्या ३४.५ टक्क्यांवरून वाढून ४५.१ टक्क्यांवर गेले. क्लायंट फंडिंग बुकद्वारे मिळणाऱ्या व्याज उत्पन्नाने एकूण महसुलात ३५.६ टक्के योगदान दिले, ज्यामधून व्यवसायातील वाढती वैविध्यतता दिसून येते.
या तिमाहीदरम्यान एंजल वनने जवळपास १५ लाख नवीन ग्राहक जोडले, जे मागील तिमाहीच्या तुलनेत ११.६ टक्के अधिक आहेत. यामुळे सप्टेंबरपर्यंत कंपनीचा ग्राहकवर्ग ३.९९ कोटींवर पोहोचला आणि त्यानंतर ऑक्टोबरमध्ये कंपनीने ४ कोटींचा टप्पा पार केला. कंपनीच्या वेल्थ मॅनेजमेंट व्यवसायाचा विस्तारही सातत्याने सुरू राहिला आहे आणि व्यवस्थापनाखालील मालमत्ता तिमाही आधारावर १९.१ टक्के आणि वार्षिक आधारावर १६०.५ टक्के वाढून १६,००० कोटी रुपयांवर पोहोचली आहे.
वाढता व्यवसाय आकार आणि सुधारत्या नफ्यासोबत उद्योग क्षेत्रात दुसरे स्थान पटकावणे हा एंजल वनच्या प्रवासातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. व्यापक किरकोळ सहभागाला प्रोत्साहन देऊन, डिजिटल सुलभता वाढवून आणि बाजारपेठेतील विविध घटकांमध्ये अधिक सहभाग सुलभ करून ही कंपनी भारतातील भांडवली बाजारपेठेचा पाया अधिक दृढ करण्यासाठी सातत्याने योगदान देत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी